‘मुंबईसाठी कायपण’, गरज पडल्यास नर्सिंगचं काम करणार – महापौर

mumbai mayor kishori pednekar new

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या सोमवारी सकाळी मुंबई महानगर पालिकेच्या नायर रुग्णालयात दाखल झाल्या. एकेकाळी नर्स म्हणून काम केलेल्या महापौरांनी अनेक वर्षानंतर पुन्हा नर्सच्या पोशाखात रुग्णालयात प्रवेश केला. किशोरी पेडणेकर यांनी परिचारिकेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सध्याचं कोविड १९ चं संकट पाहाता त्याच्याविरोधा लढण्यासाठी मुंबईतले डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि कोरोनाविरोधातल्या लढ्यासाठी हातभार लावण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयाला भेट दिली. तसेच गरज पडल्सा नर्सिंगचे काम देखील करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

‘आम्ही वर्क फ्रॉम होम करू शकत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी फील्डवर उतरलो आहोत. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरीच राहा आणि काळजी घ्या’, असा संदेश देखील महापौरांनी आपल्या परिचारिकेच्या वेशभूषेतील फोटोसोबत दिला आहे. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातील नर्सिंगच्या विद्यार्थींनींना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. या विनंतीला होकार देत पेडणेकर यांनी शंभरहून अधिक नर्सिंगच्या विद्यार्थींनींना कोरोनाच्या संकटात स्वतःची काळजी घेऊन कसे काम करावे, यावर मार्गदर्शन केले.

आपल्या भेटीबद्दल किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, नर्सिंगचे काम करणाऱ्या मुलींचे वयोमान कमी आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढिवण्यासाठी मी नायर रुग्णालयात गेले होते. या संकट काळात मलाही रुग्णसेवा करण्याची इच्छा आहे. गरज भासल्यास मी स्वतः देखील फिल्डवर उतरणार आहे.

काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे यांनी परिचारिकेचा वेश चढवून रूग्णसेवेची तयारी दाखवली होती. त्यांनी देखील परिचारिकेचं प्रशिक्षण पूर्ण केलं असून परिचारिका म्हणून काम देखील केलं आहे. या कामाचा फायदा सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात जनतेला व्हावा यासाठी त्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्या सध्या होम क्वॉरंटाईन असून त्यांचा क्वॉरंटाईन कालावधी आयुक्तांनी वाढवला आहे. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष काम करता येत नाही.