लसीने कोरोनाचा खात्मा होणार – महापौर

लस घेताच कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती तयार होईल आणि कोरोनाचा खात्मा होण्यास मदत होईल, असा आत्मविश्वास महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.

mumbai mayor kishori pednekar
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर

जीवघेण्या कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक असलेली लस मुंबईत दाखल झाली आहे. ही लस घेतल्याने कोरोनासह अनेक व्हायरसचा सामना करण्यासाठी आपल्यात रोग प्रतिकारशक्ती तयार होईल आणि कोरोनाचा खात्मा होणार आहे, असा आत्मविश्वास महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे. येत्या १६ जानेवारी रोजी मुंबईत राष्ट्रीय लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटमधून कोव्हीशिल्ड लसीचा साठा (१,३९,५०० डोस) आज पहाटेच्या सुमारास मुंबईत दाखल झाला आहे. हा लसीचा साठा पालिकेच्या परळ येथील एफ-दक्षिण विभाग कार्यालयातील कोल्ड स्टोरेजमध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आला आहे. महापौर किशोरी पेडणेकर व अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी या कोल्ड स्टोरेजच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नगरसेवक अनिल कोकीळ, नगरसेविका पुष्पा कोळी, सिंधू मसुरकर, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देविदास क्षीरसागर, कार्यकारी आरोग्य अधिकारी (प्रभारी) डॉ. मंगला गोमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

लसीकरणानंतर मोठ्या गुढ्या उभारू

‘मागील दहा महिन्यांपासून मुंबईकर कोरोनाचा सामना करत आहेत. हनुमानाने ज्याप्रमाणे संजीवनी पर्वत उचलून आणला होता, त्याप्रमाणे कोरोनावर मात करण्यासाठी ही संजीवनीरुपी लस आणण्यात आली आहे. ही लस घेतल्याने कोरोनासह अनेक व्हायरसचा सामना करण्यासाठी आपल्यात रोगप्रतिकार शक्ती तयार होईल. गेल्या मार्च महिन्यात कोरोनामुळे सर्व बंद ठेवल्यामुळे गुढीपाडवा साजरा करता आलेला नाही. पण, आता यावेळेस आपण लसीकरण करून मोठ्या मोठ्या गुढ्या उभारु’, असे महापौरांनी म्हटले आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीटपणे पार पाडल्याचे सांगतानाच आता पुढील जबाबदारी आपण पार पाडायची वेळ आहे. त्याचप्रमाणे, कोरोना लसीकरणाबाबत पालिकेने आतापर्यंत जवळजवळ ५ हजार कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले असून आणखीन १० हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा मानस आहे, असे महापौरांनी सांगितले. मुंबईत सध्या १ लाख ३९ हजार ५०० लसीचा साठा आला आहे. हा साठा कोल्ड स्टोरेजमध्ये + २ डिग्री ते + ८ डिग्री सेल्सियसमध्ये ही लस ठेवण्यात येईल. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर, तिसऱ्या टप्प्यांमध्ये पन्नास वर्षावरील नागरिकांना तसेच जोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर चौथ्या टप्प्यांमध्ये १८ वर्षावरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. आतापर्यंत १ लाख ३० हजार लस घेणाऱ्यांची नोंदणी झालेली आहे. येत्या १६ जानेवारीपासून मुंबईमधील ९ लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार आहे, अशी माहिती महापौरांनी दिली. जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआरच्या मान्यतेने हे लसीकरण होत आहे त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन लस घेतली पाहिजे, असे आवाहन महापौरांनी केले. काही लोक अफवा पसरवत आहेत, कोणीही अफवा पसरवू नये असे आवाहनही महापौरांनी केले.

लसीकरणाचे साईड इफेक्ट झाल्यास तात्काळ उपचार

मुंबईत येत्या १६ जानेवारीपासून ९ केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. त्याअगोदरच लसीचा साठा त्या त्या लसीकरण केंद्रावर पोहोचविण्यात येणार आहे. ज्या केंद्रावर ड्राय रन झाले नाही त्या केंद्रावर १५ जानेवारीला ड्राय रन घेण्याचे आयोजन करत आहोत. लस घेण्यासाठी संबंधितांना १२ प्रकारच्या कागदपत्रांची, सरकारी पुराव्यांची गरज असणार आहे.लसीकरण झाल्यावर ३० मिनिटे त्या व्यक्तीवर तज्ञ डॉक्टरांमार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. जर लसीकरण केंद्रात अथवा घरी गेल्यावर संबंधित व्यक्तीला काही साईड इफेक्ट झाल्याचे आढळले तर त्याला तात्काळ उपचार देण्यात येणार आहेत. त्यांनी तात्काळ जवळच्या लसीकरण केंद्राला कॉल करून मदत घ्यावी. तसेच, लसीकरण झाल्यामुळे आपली जबाबदारी संपली नसून यानंतरही नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे,हात धुणे या त्रिसूत्रीचा नियमितपणे वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरण मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून यासाठी एक ॲपद्वारे लघुसंदेश संबंधित व्यक्तींना जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

कांजूर कोल्डस्टोरेजचे काम दोन दिवसात पूर्ण होणार

एका शहराला एकाच कंपनीची लस देण्यात येणार आहे. मुंबईत पुणे येथील सिरमची लस आली आहे. त्यामुळे आता मार्गदर्शक सूचनांनुसार दुसऱ्या कंपनीची लस मुंबईत सध्या तरी येणार नाही. त्याचप्रमाणे, पहिल्या टप्यात येणाऱ्या लसीचा साठा हा मुंबईसाठी पुरेसा असेल. लसीच्या साठ्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा संबंधितांकडे करण्यात येणार आहे.
तसेच, कांजूर येथील कोल्डस्टोरेजचे काम येत्या दोन दिवसात पूर्ण होईल. १० लाखापेक्षा जास्त लस आली तर कांजूरमार्गला साठवली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.


हेही वाचा – Bird Flu: परभणीत ३४०० कोंबड्यांची कत्तल