मुंबई : मुंबईच्या मेट्रोने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कारण, रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्त (सीसीआरएस), नवी दिल्ली यांनी मुंबई मेट्रो लाईन 7 (रेड लाईन) आणि मेट्रो लाईन 2ए (यलो लाईन) या दोन्ही मार्गांवरील नियमित संचालनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे, तात्पुरत्या मंजुरीदरम्यान निर्धारित करण्यात आलेल्या अटींचे पूर्ण पालन सुनिश्चित झाले असून, 50 ते 60 किमी प्रति तास या मर्यादित वेगाऐवजी आता 80 किमी प्रति तास या पूर्ण क्षमतेने मेट्रो धावू शकणार आहे. (Mumbai Metro has achieved an important milestone, regular approval of CCRS for routes 7 and 2A)
मेट्रो 7 आणि 2ए या दोन्ही मार्गिका एमएमआरडीएद्वारे चालवल्या जातात. पण या दोन्ही मार्गिका मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मेट्रो लाईन 2ए या मार्गिकेवर दहिसर ते डीएन नगर हे 18.6 किमीचे अंतर असून या मेट्रो मार्गावर 17 स्थानके आहेत. मेट्रो लाईन 7 अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) हे 16.5 किमीचे अंतर असून या मार्गावर 13 स्थानके आहेत. या दोन्ही मार्गिकांवरून रोज 2.5 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात आणि आतापर्यंत एकूण 15 कोटींहून अधिक प्रवाशांनी या मेट्रो मार्गांवर प्रवास केला आहे.
हेही वाचा… Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक पाहाच, कारण…
एमएमआरडीएने चालकविरहित ट्रेन सेट्स, सीबीटीसी सिग्नलिंग, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे आणि नाविन्यपूर्ण तिकीट प्रणाली अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करून मुंबईला सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम मेट्रो नेटवर्क देण्याच्या वचनबद्धतेची पूर्तता केली आहे. या मेट्रो लाईन्स मुख्यमंत्र्यांच्या “मुंबई इन मिनिट्स” या स्वप्नपूर्तीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
मेट्रो लाईन 7 आणि 2एला नियमित मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील म्हणाले की, मेट्रो लाईन 7 आणि 2एसाठी मिळालेली नियमित मंजुरी हे मुंबईला कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसह जागतिक दर्जाचे शहर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही उपलब्धी मुंबईकरांना शाश्वत, वेळ वाचवणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय उपलब्ध करून देण्याच्या आमच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शहराच्या विकासाचा आधारस्तंभ करण्याचे आमचे वचन या विकासाच्या माध्यमातून पूर्ण करत आहोत.