घरनवी मुंबईशिवडी - नवी मुंबई - विरार - वरळी दरम्यान सिग्नल फ्री प्रवास

शिवडी – नवी मुंबई – विरार – वरळी दरम्यान सिग्नल फ्री प्रवास

Subscribe

मुंबई महानगरातच २०३० अखेरीस रिंगरूट होणार

मुंबई महानगर प्रदेशात येत्या १० वर्षांच्या कालावधीत रिंगरूट तयार होईल. मुंबईत सध्या सुरू असलेले पायाभूत सुविधा विकास प्रकल्प पाहता मुंबईत विना सिग्नल प्रवास करणे शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या चार प्रकल्पांमुळे मुंबई शहरापासून ते मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवास हा सुलभ होणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर ए राजीव यांनी दिली. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पा (एमटीएचएल) च्या विकास कामाच्या आढाव्याच्या निमित्ताने ते बोलत होते.

असा असेल रिंगरूट

एमटीएचएल प्रकल्पाची कनेक्टिव्हिटी ही विरार अलिबाग मल्टीमोडल प्रकल्पासाठी असेल. तसेच भाईंदर विरार ब्रिजचेही काम सुरू आहे. या विरार ब्रिजला विरार अलिबाग मल्टीमोडल प्रकल्पाची जोड असेल. कोस्टल रोडला हा प्रकल्प पुढे जोडला जाईल. त्यामुळे कोस्टल रोडने वरळी पर्यंतचा प्रवास करता येईल. एमटीएचएल प्रकल्पाचा भाग असलेल्या दुसऱ्या टप्प्यात वरळी शिवडी या टप्प्याच्या कनेक्टिव्हिटीने हा रिंगरूटचा मार्ग पुर्ण होईल असे राजीव म्हणाले. सध्या हे रिंगरूटचा मार्ग कुठे कागदोपत्री नाहीत, पण २०३० अखेरीस हा रिंगरूट नक्कीच तयार होईल, असे त्यांनी सांगितले. एमटीएचएलचा प्रकल्प हा सप्टेंबर २०२२ पर्यंत पुर्ण होणे अपेक्षित आहे. तर मल्टीमोडल कॉरिडॉरच्या प्रकल्पात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून काम हाती घेण्यात आले आहे. विरार ब्रिजच्या कामासाठी काही परवानग्या घेण्यात आल्या आहेत. तर काही परवानग्या प्रतिक्षेत आहेत असेही ते म्हणाले.

- Advertisement -

१०० वर्षे आयुष्यमान

एमटीएचएलचा प्रकल्प हा भारतातला सर्वात लांब असा २१.८० किमी लांब सागरी सेतूचा प्रकल्प असेल. दोन्ही दिशेला चार पदरी असे या सागरी सेतूसाठीच्या मार्गिका असतील. त्यापैकी दोन मार्गिका या एमर्जन्सी म्हणून कार्यरत असतील. मुंबईपासून ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला या प्रकल्पातील कनेक्टिव्हिटी असेल. एकुण १०० वर्षे आयुष्यमान असलेले सागरी सेतू एमएमआरडीएमार्फत विकसित करण्यात येत आहे.

फ्लेमिंगोसाठी साऊंड बॅरिअर

पर्यावरणीयदृष्ट्या या भागातील जीवसृष्टी टिकून रहावी याचीही दक्षता प्रकल्पाच्या निमित्ताने घेण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून फ्लेमिंगो पक्षाच्या प्रकल्पाच्या सभोवतालच्या वावरासाठी अडथळा नको म्हणून साऊंड बॅरिअरही लावण्यात आले आहेत. तसेच टाटा पॉवरसारख्या कंपनीच्या जागेतही व्हिजन बॅरिअर लावण्यात आले आहेत. अवघ्या ४० मिनिटात शिवडी ते न्हावाशेवा हा प्रवास करता येणार आहे. मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकच्या सध्याच्या लांबीच्या चारपट इतका लांब असा सागरी सेतू हा एकुण चार पॅकेजमध्ये बांधण्यात येत आहे. भारतातला तसेच जगातला सर्वात जास्त लांबीचा विक्रमही या सागरी सेतूच्या नावावर होणार आहे.

- Advertisement -

जपानचे ऑर्थोट्रॉपिक तंत्रत्रानाचा पहिल्यांदा वापर

फ्लेमिंगोसारख्या पक्षांना अडथळा येऊ नये म्हणून जपानच्या कंपनीचे ऑर्थोट्रॉपिक तंत्रज्ञान या सागरी सेतूसाठी वापरण्यात येणार आहे. एकुण १८० मीटरचे डेक वापरून ब्रिजच्या कामासाठी ऑर्थोट्रॉपिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे वांद्रे वरळी सी लिंकसारखे केबल स्टेडची वायर यासाठी वापरावी लागणार नाही. शिवाय फ्लेमिंगो पक्षांनाही त्याचा अडथळा होणार नाही. एकुण २८०० मेट्रिक टन वजनाचा हा १८० मीटरचा डेक आहे. कोळी बांधवांच्या बोटी जाण्यासाठीची जागाही या प्रकल्पाच्या दरम्यान एका मार्गिकेवर तात्पुरता ब्रिज तयार करून देण्यात आली आहे. कोरोनामुळे या प्रकल्पाच्या कामावर परिणाम झाला आहे, पण प्रकल्प नियोजित वेळेत पुर्ण होईल असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.


 

 

 

 

 

 

 

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -