मुंबईत थंडी वाढली; किमान तापमान १५ अंशाखाली जाण्याची शक्यता

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांनी उबदार कपडे परिधान करणे पसंद केले आहे. अशातच आज मुंबईचे किमान तापमान सोमवारपेक्षाही कमी नोंदवले जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

winter in mumbai

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांनी उबदार कपडे परिधान करणे पसंद केले आहे. अशातच आज मुंबईचे किमान तापमान सोमवारपेक्षाही कमी नोंदवले जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोमवारी सकाळपासून वाहत असलेल्या वाऱ्यांमुळे मंगळवारी मुंबईतील किमान तापमान १५ अंश किंवा त्याहून कमी असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Mumbai Minimum TemperatureLikely To Be Lower Today)

मुंबईत मंगळवारी किमान तापमान १५ अंश किंवा त्याहून कमी असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २५ आणि २६ जानेवारीलाही मुंबईमध्ये सकाळी वातावरण थंड असेल. तसेच, येत्या सहा दिवसांमध्ये मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा २९ अंशांच्या पलीकडे जायची शक्यता कमी असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. २४ ते २६ जानेवारी या तीन दिवसांच्या काळात मुंबईत सकाळी धुक्याचे वातावरणही असेल.

मुंबईत सोमवारी कमाल तापमान सांताक्रूझ येथे २६.५, तर कुलाबा येथे २५.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. डहाणू येथे २३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. कोकण विभागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंशांनी घसरले आहे. राज्यात उर्वरित भागात मात्र कमाल आणि किमान तापमान सरासरीहून अधिक आहे. तसेच, सोमवारी सकाळी सांताक्रूझ येथे १५.६, तर कुलाबा येथे १७.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली.

रविवारी सांताक्रूझ येथे १७, तर कुलाबा येथे १९.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. रविवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३० अंश होते, तर कुलाबा येथे २६.४ अंश सेल्सिअस नोदवण्यात आले. कुलाबा येथे कमाल तापमानात रविवारपेक्षा मोठी घसरण झाली नाही. मात्र सांताक्रूझ येथे २४ तासांमध्ये तापमानात ३.५ अंशांनी घट झाली.

तापमानात घसरण झाल्याने याचा परिणाम सध्या उत्तर मुंबई, डहाणू येथे दिसत आहे. कोकणावरही याचा किंचित परिणाम दिसत आहे. डहाणू येथे कमाल तापमान ४.१ अंशांनी, हर्णे येथे ३.२ अंशांनी आणि रत्नागिरी येथे सरासरीहून दोन अंशांनी कमी नोंदले गेले. त्याशिवाय, विदर्भात ३० ते ३२ अंश, मराठवाड्यातही ३० ते ३२ अंश, तर मध्य महाराष्ट्रात ३० अंशांच्या आसपास कमाल तापमानाची नोंद सोमवारी झाली.


हेही वाचा – पदवीधर निवडणुक : मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारी रोजी होणाऱ्या ‘या’ परीक्षा पुढे ढकलल्या