शाळा सुरू करण्याबाबत मुंबई महापालिका अनुकूल

लहान मुलांच्या लसीकरणानंतरच शाळा सुरू करण्याचे कोविड टास्क फोर्सचे मत

Student allowed to come to school after permission of parents said Education Officer
Mumbai School Reopen: पालकांच्या परवानगीनंतरचं विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश, शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती

मुंबई : राज्यात कोरोना नियंत्रणात आल्यामुळे आता अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. मात्र, शाळा बंद आहेत. त्या कधी सुरू होणार हा प्रश्न विचारला जात आहे. त्यातच मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासन अनुकूल असल्याचे समोर आले आहे. मात्र, लहान मुलांच्या लसीकरणानंतरच शाळा सुरू कराव्यात, असे कोविड टास्क फोर्सचे मत आहे. त्यामुळे शाळा नेमक्या कधी सुरू होणार, असा गोंधळ सध्या तरी कायम आहे.

राज्यातील कोरोना अनलॉकनंतर सार्वजनिक ठिकाणी, गर्दीत लहान मुलांचा वावर वाढल्यानंतरही लहान मुलांमधील कोविड केसेस नगण्य असल्याचे दिसून येतेय. त्यामुळे बगीचे, क्रिडांगणे ,बाजार याठिकाणी लहान मुलांचा वावर वाढला असताना शाळा सुरू करण्यास हरकत नाही, असे महापालिकेचे मत आहे.

मुंबईमध्ये पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करण्याकरता मुंबई महापालिकेने तयारी दर्शवली आहे. तसे राज्य सरकारलाही कळवण्यात आले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर कोविड रुग्णसंख्या वाढलीच तरी महापालिका प्रशासन पूर्ण सक्षम आहे, असे महापालिकेने राज्य सरकारला कळवले आहे. येत्या मंगळवारी टास्क फोर्सची याबाबत एक बैठक आहे. त्यामध्ये शाळा सुरू करायच्या की नाहीत यावर काहीतरी ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे.

टास्क फोर्सचे काय मत?

राज्यात अजून लहान मुलांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आधी लहान मुलांचे लसीकरण सुरू करावे आणि मगच शाळा सुरू कराव्यात असा आग्रह आहे. अनेक महिने लहान मुले शाळेत गेलेली नाहीत. त्यामुळे पेडियाट्रिक लसीकरण लवकरात लवकर सुरू करून मगच शाळा सुरू कराव्यात, असा सल्ला टास्क फोर्सने दिलाय.