Coronavirus : रुग्णसंख्या वाढल्याने रूग्णालयासह यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश

सोमवारी कोरोना रुग्णांची संख्या ३१८ एवढी होती. पुढील २४ तासात म्हणजे मंगळवारी ही लोकसंख्या वाढून ५०६ वर गेली होती. आता आणखीन २४ तासांत म्हणजे बुधवारी त्यामध्ये आणखी वाढ होऊन ही संख्या आता ७३९ वर गेली आहे.

two new corona XE Kapa variant found in mumbai

मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या (Coronavirus patient) संख्येत झपाटयाने वाढ होत असल्याने पालिका आयुक्त व प्रशासक इकबाल चहल (Iqbal Chahal) यांनी, पालिका व खासगी आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या ४८ तासात कोरोना रुग्ण संख्येत तब्बल ४२१ ने वाढ होऊन रुग्ण संख्या ३१८ वरून थेट ७३९ वर गेली आहे. त्यामुळे राज्य शासन व मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पालिका आयुक्तांनी जंबो कोरोना सेंटर सज्ज ठेवण्याचे व कोरोना चाचण्या वाढविण्याचे आणि लसीकरण आणखी वेगाने करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

सोमवारी कोरोना रुग्णांची संख्या ३१८ एवढी होती. पुढील २४ तासात म्हणजे मंगळवारी ही लोकसंख्या वाढून ५०६ वर गेली होती. आता आणखीन २४ तासांत म्हणजे बुधवारी त्यामध्ये आणखी वाढ होऊन ही संख्या आता ७३९ वर गेली आहे. त्यामुळे आता शासन व पालिका प्रशासन यांनी त्याची गंभीर दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे आणि आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

हलगर्जीपणामुळे संसर्ग वाढीस

कोरोना -१९ विषाणूच्या पहिल्या, दुसऱया व तिसऱ्या लाटेला पालिका आरोग्य यंत्रणेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून रोखण्याचे काम केले. त्यामुळेच शासनाने, पालिकेने कोरोनाबाबतच्या कडक नियमांत व लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. त्यामुळे मुंबईतील जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत झाले. मात्र सर्व काही सुरळीत असतानाच आता गेल्या काही दिवसांपासूम कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली. काही लोकांच्या हलगर्जीपणामुळे आता कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जनतेने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः मुंबई व पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

कोरोनाचे नवीन उपप्रकार

सद्यस्थितीत जगातील विविध देशांमध्ये कोरोनाचे नवीन उपप्रकार आढळले असून संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुंबईत देखील अलीकडे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढते आहे. गेल्या २४ तासांत कोरोना मुंबईत कोरोना लसीकरण व्यापक स्तरावर झाले असले तरी गाफील न राहता काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच पावसाळा सुरू होण्याच्या बेतात असल्याने रुग्ण संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर, पालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल यांनी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला व सर्व संबंधित खाते, विभाग यांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश

१) बाधित रुग्ण निदान होण्यासाठी कोरोना चाचण्या युद्धपातळीवर वाढवाव्यात. त्यासाठी सर्व वैद्यकीय प्रयोगशाळा मनुष्यबळासह सुसज्ज असाव्यात.

२) १२ ते १८ वर्षे वयोगटातील पात्र मुला-मुलींच्या कोरोना लसीकरणास वेग द्यावा. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात बूस्टर डोस घेण्यास पात्र नागरिकांना देखील लस घेण्यास प्रवृत्त करावे.

३) जम्बो कोरोना रुग्णालयांनी सतर्क राहावे आणि तेथे पुरेशा संख्येने मनुष्यबळ तैनात राहील, याची खातरजमा करावी.

४) सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्ष अर्थात वॉर्ड वॉर रूममध्ये पुरेसे वैद्यकीय कर्मचारी, इतर कर्मचारी आणि रुग्णवाहिका उपलब्ध राहतील, यादृष्टीने आढावा घ्यावा.

५) खासगी रुग्णालयांना देखील सतर्क राहण्याविषयी सूचना द्याव्यात.

६) नजीकच्या कालावधीत रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱयांची संख्या वाढू लागली तर रुग्णांना प्राधान्याने मालाड येथील जम्बो कोरोना रुग्णालयात दाखल करावे.

७) सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागात दैनंदिन कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.

८) सर्व अतिरिक्त आयुक्तांनी आपापल्या अखत्यारितील क्षेत्रांमध्ये स्थित जम्बो कोरोना रुग्णालयांना भेटी द्याव्यात. पावसाळी उपाययोजनांच्या दृष्टीने या जम्बो कोरोना केंद्रांमध्ये संरचनात्मक स्थिरता, पर्जन्य जल उदंचन यंत्रणा, अग्निशमन उपाययोजना, वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचारी, औषधसाठा आणि वैद्यकीय सामग्री, वैद्यकीय प्राणवायू यंत्रणा, आहार, स्वच्छता इत्यादींशी निगडित सर्व बाबी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्या सुस्थितीत कार्यान्वित आहेत, याची खातरजमा करावी, असेही आयुक्तांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.