मुंबई : एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी राज्यातील अनेक गोष्टींमध्ये जातीने लक्ष घातलेले आहे. विशेषतः त्यांनी मुंबईच्या सुशोभीकरणावर आणि स्वच्छतेवर जातीने लक्ष घातलेले आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांना हवे तसे काम होत नसल्याने त्यांनी आता याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र स्वच्छता प्रत्येक विभागात होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांना एक महिन्यांचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अल्टिमेटमचा गांभिर्याने वितार करून एका महिन्यामध्ये चहल हे महापालिकेच्या सर्व परिमंडळांचे उपायुक्त व विभागीय सहायक आयुक्तांना कामाला लावून स्वच्छता मोहिम राबवणार की स्वतः पदावरून पायउतार होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal will step down? Ultimatum of CM Eknath Shinde)
हेही वाचा – तीन वर्षांसाठी वाघनखं भारतात आणणार, मुंबईत ‘या’ वस्तूसंग्राहलयात ठेवण्यात येणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांआधी स्वच्छतेच्याबाबत मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या कानउघडणी केल्या होत्या. जो अधिकारी किंवा कामगार स्वच्छतेच्याबाबत कामचुकारपण करेल, त्याला थेट निलंबित करण्यात येईल, असा सज्जड दम एकनाथ शिंदे यांनी भरला होता. ज्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी थेट मुंबई महापालिका आयुक्तांनाच अल्टिमेटम दिला आहे. तर कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची कामे करून घेण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांची आहे, त्यामुळे चहल यांनी महिनाभराच्या आत काम करून घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (ता. 01 ऑक्टोबर) दिले. तसेच, स्थानिकांना तातडीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दररोज पाच वेळा स्वच्छतागृहांची स्वच्छता करावी, महापालिकेच्या खर्चाने त्याची दुरुस्ती, डागडुजी करावी आणि तसे न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावावी, कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी असेही स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
मुंबई स्वच्छ आणि सुंदर दिसावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. विविध मोहिम राबवून कचरा आणि राडारोटा हटवणे, मुंबईला विद्रुप करणारे बॅनर आणि फलक काढून टाकणे अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेल्या आहेत. परंतु, मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊन सुद्धा काम नीट होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये महापालिकेच्या निधीतून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’ चा नारा देण्यात आलेला असला तरी अनेक ठिकाणी दुर्गंधी आणि कचरा कायम आहे. तर कामे नीट होत नसल्याने राज्य सरकारच्यावतीने कामगारांची चौकशी करण्यात येत आहे. ज्यामुळे कर्माचाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
परंतु आता अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत महापालिका आयुक्त कोणत्याही प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री तथा अन्य मंत्र्यांकडे बाजू मांडत नसल्याने कर्मचाऱ्यांमधील नाराजी वाढली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या सूचनांचे पालन विभागीय उपायुक्त व सहायक आयुक्तांकडून करण्यात येत नाही. मात्र आता पुढील महिन्याभरामध्ये आयुक्तांकडून मुख्यमत्र्यांनी केलेल्या आदेशाचे पालन झाले नाही तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, महापालिका आयुक्तांचा तीन वर्षांचा कालावधी संपुष्टात आला असून पावसाळ्याच्या कालावधीत त्यांची बदली करण्याऐवजी त्यांना त्या पदावर कायम ठेवले आहे. परंतु आता पावसाळा संपल्याने आयुक्त चहल यांची केव्हाही बदली होणार? याबाबत देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.