घरताज्या घडामोडीमुंबई महापालिकेच्या १० सीबीएसई शाळांमध्ये प्रवेश सुरू

मुंबई महापालिकेच्या १० सीबीएसई शाळांमध्ये प्रवेश सुरू

Subscribe

मुंबईतील गरीब व दुर्बल घटकातील पालकांचा व विद्यार्थ्यांचा ओढा इंग्रजी शाळांकडे असला तरी त्यांना सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या शाळेत शिक्षण घेणे परवडत नाही. मात्र आपल्या मुलाच्या भविष्यासाठी ते कर्ज काढून त्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. ही बाब लक्षात घेऊन पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत दहा ठिकाणी सीबीएसई मंडळाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून गुरूवारपासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

यासंदर्भातील माहिती ,पालिका शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी दिली आहे. तसेच, मुंबईत सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका असल्याचे त्यांनी सांगितले. विषेश म्हणजे पालिकेच्या या दहा शाळांमध्ये ज्युनिअर केजी ते इयत्ता सहावीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. आजपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे संध्या दोशी यांनी सांगितले. गतवर्षी, जोगेश्वरी (पूर्व), पूनमनगर मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसईची शाळा सुरू करण्यात आली होती. या शाळेला मिळालेला प्रतिसाद पाहून सीबीएसई बोर्डाच्या दहा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. वास्तविक, मुंबई महापालिकेतर्फे मराठी, हिंदी, गुजराती आदी आठ विविध भाषांमधून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात येते. एवढेच नव्हे तर या शाळांमधील विद्यार्थ्यांना २७ प्रकारच्या शालेय वस्तू दरवर्षी मोफत देण्यात येतात. व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक शिक्षण दिले जात आहे.

- Advertisement -

कुठे किती शाळा ?

जी /उत्तर विभागात, भवानी शंकर रोड शाळा, एफ /उत्तर विभागात काणेनगर, मनपा शाळा, के/पश्चिम विभागात प्रतीक्षा नगर मनपा शाळा, एल विभागात तुंगा व्हिलेज, नवीन इमारत, एन विभागात राजावाडी मनपा शाळा, एम/पूर्व विभागात २ अझीझ बाग मनपा शाळा, पी/उत्तर विभागात दिंडोशी मनपा शाळा, पी/ उत्तर विभागात जनकल्याण नवीन इमारत, टी विभागात मिठानगर शाळा, मुलुंड, एस विभागात हरियाली व्हिलेज, मनपा शाळा विक्रोळी या दहा ठिकाणी सीबीएसई शाळांमध्ये प्रवेश सुरू करण्यात आले आहेत, असे संध्या दोशी यांनी सांगितले.

पालिका कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ५% प्रवेश राखीव

पलिकेच्या या दहा सीबीएसई शाळांमध्ये विद्यार्थ्यांना २५ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत ऑनलाईन प्रवेश घेता येणार आहे. ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया अडचणीची वाटत असेल तर त्यांच्या मदतीकरिता शाळांमध्ये कर्मचारीही ठेवण्यात आले आहेत. या शाळांमध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना लॉटरी पद्धतीने ९० टक्के प्रवेश दिले जाणार आहेत. ५ टक्के प्रवेश महापौरांच्या शिफारशीनुसार व ५ टक्के प्रवेश पालिका कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी राखीव असतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -