गणेश मंडळांसाठी आनंदाची बातमी! माघी गणेशोत्सवासाठी आता वेगळ्या परवानगीची गरज नाही

mumbai municipal corporation bmc issue guidlines for maghi ganeshotsav 2023

राज्यात 25 जानेवारीला( माघ महिना)रोजी श्रीगणेश जयंती, विनायकी चतुर्थी आहे. बाप्पाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी तयारी सुरु आहे. मात्र मुंबई महापालिकेच्या एका निर्णयामुळे मुंबईतील गणेशमंडळांच्या आनंदात भर पडली आहे. माघी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई महापालिकेने गणेश मंडळांना गेल्या वर्षी मिळालेली परवानग्या यावर्षीही ग्राह्य धरल्या जाणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे गणेश मंडळांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

मुंबई महापालिकेने गतवर्षीच्या धर्तीवर पात्र ठरलेल्या मंडळांना सहज परवानगी देण्यास हिरवा कंदील दर्शवला आहे; मात्र नवीन गणेशोत्सव मंडळांना माघी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस यांची परवानगी घेणे पालिकेने बंधनकारक केले आहे.

तसेच, कोरोना – १९ किंवा त्या अनुषंगिक विविध प्रकारांच्या प्रादुर्भावाचा किंवा पुनरुद्भवाचा संभाव्य धोका विचारात घेता, शासनाने उत्सव कालावधीत ‘कोरोना – १९’ या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जारी केल्यास, सदर परिस्थितीत त्यांचे पालन केले जाईल, अशा आशयाचे हमीपत्र मंडळांकडून घेण्यात येणार आहे.

शहर व उपनगरे क्षेत्रात साजरे होणाऱ्या माघी श्रीगणेशोत्सवादरम्यान मुंबई महापालिका व मुंबई पोलिस दल यांच्याद्वारे देण्यात येणा-या सुचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन देखील मुंबई महापालिकेद्वारे करण्यात आले आहे.

यंदाचा माघी गणेशोत्सव २५ जानेवारीपासून साजरा होणार आहे. या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल चहल व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार परिमंडळ २ चे उप आयुक्त रमाकांत बिरादार यांच्याद्वारे महापालिकेने गणेशोत्सव मंडळांना काही अटी शर्ती लागू केल्या आहेत.

आवश्यकतेनुसार कृत्रिम तलाव

शहर व उपनगरे येथील महापालिकेच्या २४ विभागीय सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या अधिपत्याखालील विभागात माघी गणेशोत्सवादरम्यान उभारावयाच्या कृत्रिम तलावांबाबत आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर आवश्यकतेनुसार यथायोग्य सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी, असे फर्मान आयुक्तांनी काढले आहे. तसेच, माघी गणेशोत्सवादरम्यान मंडप उभारणीच्या परवानगीसाठी प्रतिवर्षीप्रमाणे असंगणकीय कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

माघी गणेशोत्सवासाठी घेतलेल्या शुल्काचा परतावा लवकरच

महापालिका आयुक्तांनी माघी गणेशोत्सवादरम्यान उभारण्यात येणा-या मंडपाचे शुल्क पूर्णपणे माफ करण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. यास्तव, फक्त याच वर्षापुरते माघी गणेशोत्सवादरम्यान उभारण्यात येणा-या मंडपांसाठी शुल्क पूर्णपणे माफ करण्यास मंजुरी दिली आहे. तथापि, विभाग कार्यालयामार्फत परिपत्रक निर्गमित होण्यापूर्वीच माघी गणेशोत्सवाच्या मंडपासाठी सशुल्क परवानगी दिली गेली असल्यास शुल्क परताव्याची कार्यवाही करण्याचे निर्देश २३ जानेवारी रोजीच्या परिपत्रकांन्वये देण्यात आले आहेत.


ऐन लग्नसराईत सोने खरेदी महागली; तोडले सर्व रेकॉर्ड, जाणून घ्या आजचा भाव