नालेसफाई १०५ टक्के झाल्याचा पालिकेचा दावा, ७० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्यास मुंबईची तुंबई होणार

Mumbai Municipal Corporation claims that non-sanitation is 105 percent
नालेसफाई १०५ टक्के झाल्याचा पालिकेचा दावा, ७० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्यास मुंबईची तुंबई होणार

मुंबईत पावसाळ्यापूर्वी १०५.२० टक्के नालेसफाईची कामे करण्यात आली आहेत, असा दावा पालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी केला आहे. ताशी ६० – ७० मिमी पाऊस पडल्यास त्यास पालिका यंत्रणा समर्थपणे तोंड देऊ शकेल. मात्र, ७० मिमी पेक्षाही जास्त पाऊस पडल्यास, अतिवृष्टी झाल्यास मुंबईत पाणी साचेल व त्याचा निचरा करण्यासाठी पालिका यंत्रणा प्रयत्न करेल, असे पी. वेलरासू यांनी सांगितले.

मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे करते. यंदा पावसाळ्यापूर्वी १०५.२० टक्के नालेसफाईची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये, शहर भागात -१०६.१३ टक्के, पश्चिम उपनगरात १०४.५३ टक्के , पूर्व उपनगरात १०६.१३ टक्के नालेसफाईची कामे करण्यात आली आहे. तसेच, मिठी नदीची ९७.२३ टक्के आणि लहान नाल्यांची १०९.८९ टक्के सफाई करण्यात आली आहे. नालेसफाई कामाच्या माध्यमातून ९ लाख ५० हजार मेट्रिक टन गाळ काढला आहे, असा दावा पी. वेलरासू यांनी यावेळी केला.

मुंबई शहर व उपनगरात ३८६ फ्लडिंग पॉईट्स होते. त्यापैकी यंदा २८२ फ्लडिंग पॉईट्स कमी झाले आहेत. शिल्लक १०४ फ्लडिंग पॉईट्सपैकी ३० फ्लडिंग पॉईट्स जवळ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उर्वरित ७१ ठिकाणी उपाययोजना करण्यात येत असून त्यासाठी ८०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. पुढील दोन वर्षांत हे ७१ फ्लडिंग पॉईट्स पूरमुक्त होतील, असा दावाही अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी यावेळी केला. त्याचप्रमाणे, पावसाळ्यात सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा उपसा करण्यासाठी कमी – अधिक क्षमतेचे ४७७ पंप बसवण्यात येणार आहेत. या पंप व्यवस्थेवर जवळजवळ ८० – ९० कोटी रुपये खर्चण्यात येणार आहेत.

दरम्यान, पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी खड्ड्याचे फोटो काढून अँप किंवा dm. mcgm. gov. in या वेबसाईटवर पाठविल्यास २४ तासाच्या आत खड्डे बुजवण्यात येतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.