घरताज्या घडामोडीमुंबई महापालिकेची कडक कारवाई; 'पिचकारी' बहाद्दरांकडून ३९ लाखांची दंडवसुली

मुंबई महापालिकेची कडक कारवाई; ‘पिचकारी’ बहाद्दरांकडून ३९ लाखांची दंडवसुली

Subscribe

मुंबई महापालिकेच्या ‘क्लिनअप मार्शल’पथकाने गेल्या ९ महिन्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १९ हजारांपेक्षाही जास्त पिचकारी बहाद्दरांकडून प्रति व्यक्ती २०० रुपयांप्रमाणे ३९ लाख १३ हजार १०० इतकी दंड वसुली केली आहे. यासंदर्भांतील माहिती उप आयुक्त (डॉ.) संगीता हसनाळे यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेने ‘स्वच्छ व सुंदर मुंबई’ साठी २००६ मध्ये एक कायदा केला. या कायद्याच्या अंतर्गत रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी घाण करणारे, थुंकणारे, लघुशंका करणारे, कचरा, डेब्रिज टाकणारे यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली. यासंदर्भात पालिकेने खासगी संस्थेच्या सहभागाने ‘क्लिनअप’ मार्शल पथकाची नेमणूक केली.

त्यानुसार, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या, थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मुंबई महापालिका नागरिकांना विविध नागरी सुविधा देताना आपल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी देखील नियमितपणे घेत असते. या अंतर्गत आरोग्य सुविधा देण्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंबही सातत्याने करण्यात येतो.

- Advertisement -

याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध व्हावा, यादृष्टीने जनजागृतीपर आणि दंडात्मक कारवाई देखील सातत्याने करण्यात येते. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना, क्षयरोग यासारख्या विविध रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर महापालिकेद्वारे २०० रुपये एवढा दंड आकारण्यात येत आहे. गेल्या ९ महिन्यांमध्ये १९ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्ल तब्बल रुपये ३९ लाख १३ हजार १०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती उपआयुक्त (डॉ.) संगीता हसनाळे यांनी दिली आहे.

याबाबत एका जनहित याचिकेच्या प्रकरणी मा. उच्च न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या आदेशांनुसार ही कारवाई अधिक तीव्र करण्यासोबतच प्रभावी जनजागृती करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. तरी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना आवर्जून मुखपट्टी (मास्क) वापरावी, वारंवार हात धुवावेत किंवा सॅनिटाईज करावेत आणि दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

- Advertisement -

याअंतर्गत सर्वाधिक दंड वसुली ‘ए’ विभागात प्रामुख्याने फोर्ट, कुलाबा इत्यादी परिसरांत करण्यात आली आहे. या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांकडून ६ लाख १५ हजार ८०० रुपये इतकी दंडवसुली करण्यात आली आहे. या खालोखाल प्रामुख्याने कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या ‘एल’ विभागातून ६ लाख १२ हजार २०० रुपये तर ‘सी’ विभागातून ४ लाख ५२ हजार २०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे.

विभागनिहाय दंड रकमेची माहिती पुढीलप्रमाणे….

ए विभाग – ६,१५,८०० रुपये

बी विभाग – ३,२२,२०० रुपये

सी विभाग – ४,५२,२०० रुपये

डी विभाग – २,५७,२०० रुपये

ई विभाग – २०,००० रुपये

एफ दक्षिण विभाग – २,१७,४०० रुपये

एफ उत्तर विभाग – ५०,६०० रुपये

जी दक्षिण विभाग – २६,००० रुपये

जी उत्तर विभाग – २५,९०० रुपये

एच पूर्व विभाग – १,७१,४०० रुपये

एच पश्चिम विभाग – २५,८०० रुपये

के पूर्व विभाग – २७,००० रुपये

के पश्चिम विभाग – ९५,६०० रुपये

पी दक्षिण विभाग – १,०५,८०० रुपये

पी उत्तर विभाग – ३,७९,६०० रुपये

आर दक्षिण विभाग – ३४,३०० रुपये

आर मध्य विभाग – ४३,८०० रुपये

आर उत्तर विभाग – १,१९,८०० रुपये

एल विभाग – ६,१२,२०० रुपये

एम पूर्व विभाग – २०,४०० रुपये

एम पश्चिम विभाग – १,१६,८०० रुपये

एन विभाग – ७१,३०० रुपये

एस विभाग – ९०,४०० रुपये

टी विभाग – ११,६०० रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -