घरमुंबईमुंबईत पाळीव, भटक्या प्राण्यांवर होणार अंत्यसंस्कार, मुंबई मनपाने केली स्मशानभूमीची व्यवस्था

मुंबईत पाळीव, भटक्या प्राण्यांवर होणार अंत्यसंस्कार, मुंबई मनपाने केली स्मशानभूमीची व्यवस्था

Subscribe

मुंबई महापालिकेने मानवी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी, दफनभूमी यांची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे आजाराने, अपघाताने मृत पावणाऱ्या लहान पाळीव, भटक्या प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मालाड (प.), कोंडवाडा (एव्हरशाईन नगर) येथे दहन व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेने मानवी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी, दफनभूमी यांची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे आजाराने, अपघाताने मृत पावणाऱ्या लहान पाळीव, भटक्या प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मालाड (प.), कोंडवाडा (एव्हरशाईन नगर) येथे दहन व्यवस्था करण्यात आली आहे. देशात प्रथमच मुंबईत पाळीव, भटक्या प्राण्यांच्या मृतदेहांवर सन्मानपूर्वक व मोफत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केटल पाँड कार्यालय येथे 50 किलो क्षमतेची पीएनजीवर आधारित ही दहन व्यवस्था आहे. नैसर्गिक वायू (पीएनजी) आधारित हे दहन होणार असल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. पीएनजीवर आधारीत देशातील हा पहिलाच प्रयोग असेल, अशी माहिती उपआयुक्त संजोग कबरे यांच्याकडून देण्यात आली आहे. (Mumbai Municipal Corporation has arranged a crematorium for the cremation of domestic and stray animals)

हेही वाचा – डोंबिवलीतील तीन मजली जुनी इमारत कोसळली, दुर्घटनेत काही रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकले

- Advertisement -

मुंबई महापालिकेने आज शुक्रवारी (ता. 15 सप्टेंबर) आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपचे स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते पाळीव, भटक्या मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या व्यवस्थेचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी, महापालिकेचे उपआयुक्त (विशेष) संजोग कबरे, पी/उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख तथा देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण, राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त शैलेश पेठे, सहाय्यक महाव्यवस्थापक डॉ. सचिन कुलकर्णी, वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज माने, डॉ. योगेश वानखेडे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राठोड यांच्यासह विविध प्राणिमित्र संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

पाळीव अथवा भटके लहान मांजर, ‌कुत्रे आदींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईत पालिकेकडून कोणतीही विशेष व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. नागरिक त्यांचे मृतदेह उघड्या जागेत, कचऱ्याच्या ठिकाणी टाकून देत होते. त्यामुळे सदर परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरण्याची प्रकरणे समोर येत होती. मात्र आता पालिकेने सदर मृत पाळीव अथवा भटकी कुत्री, मांजरी यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मालाड येथील कोंडवाडा येथे खास पर्यावरणपूरक व्यवस्था केली आहे.

- Advertisement -

महापाकिकेने, लहान पाळीव, भटक्या मृत प्राण्यांसाठी सन्मानपूर्वक अंत्यविधीची सुविधा मालाडमध्ये उपलब्ध करुन देत दयाभाव जोपासला आहे. नैसर्गिक वायू आधारीत दहनाची अशी सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले आहे. ही सेवा विनामूल्य असून मुंबईतील प्राणिमित्र आणि नागरिक यांनी लहान पाळीव प्राण्यांचा शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यविधी होण्यासाठी या सुविधेचा उपयोग करावा, असे आवाहन खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले आहे. तसेच, मुंबईच्या अशा अभिनव नागरी सेवांचे आणि पुढाकाराचे देश पातळीवर अनुकरण करण्यात येईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

अनेक वर्षांपासून प्राणिमित्र संघटनांकडून मृत प्राण्यांचे शास्त्रोक्त दहन सुविधा यासाठी मागणी होत होती, त्याची पूर्तता या माध्यमातून झाली आहे. या दहन व्यवस्थेसाठी इंधन स्वरुपात वायू पुरवठ्याची सुविधा ही महानगर गॅस लिमिटेडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, लवकरच याठिकाणी लहान पाळीव प्राण्यांचे शवागारची (मॉर्च्युरी) देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले.

ही सुविधा मालाडमध्ये उपलब्ध असली तरी त्याचा उपयोग पश्चिम उपनगरासह संपूर्ण मुंबईतील प्राणिप्रेमींना त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी करता येईल. दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 या कालावधीत ही सुविधा विनामूल्य मिळणार आहे, त्यामुळे नागरिकांना त्याचा मोठा व सहजपणे उपयोग होईल. सदर दहन व्यवस्थेची पाच वर्षांची देखभाल व प्रचालन व्यवस्था ही मे. अनिथा टेस्ककॉट इंडिया प्रा. लि. यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, असे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -