घरमुंबईअस्लम शेख यांच्या मदतीने उभारलेल्या मढ स्टुडिओला पालिकेची नोटीस, भाजपा आंदोलनानंतर कारवाई

अस्लम शेख यांच्या मदतीने उभारलेल्या मढ स्टुडिओला पालिकेची नोटीस, भाजपा आंदोलनानंतर कारवाई

Subscribe

मुंबई – माजी मंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने मढ-मार्वे येथे अनधिकृतपणे स्टुडिओ उभारण्यात आला आहे. या स्टुडिओ प्रकरणात तब्बल एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. ह्या स्टुडिओवर कारवाई करून तो हटविण्यात यावा, या मागणीसाठी भाजपतर्फे शुक्रवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. त्याची गंभीर दखल घेऊन पालिकेने सदर स्टुडिओचा शूटिंगसाठी होत असलेला वापर तात्काळ बंद करण्याबाबत स्टुडिओ मालक ‘बालाजी तिरुपती सिनेमा’ यांना नोटीस बजावली आहे.

या प्रकणात, माजी मंत्री अस्लम शेख यांचे नाव घेऊन भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अस्लम शेख हे अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच,सदर स्टुडिओ बंद झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

दरम्यान, पी/ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी, सदर स्टुडिओ मालक पालिकेने नोटीस बजावली असून तेथे शूटिंग व वापर बंद करण्याचे नोटिशीद्वारे फर्मावले असल्याचे सांगितले. माजी मंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना मालाड मढ-मार्वे येथे पर्यावरण खाते व पालिका यांच्या परवानगीने तब्बल ५ हजार चौ. फूट जागेत ५ स्टुडिओ उभारण्यात आला. त्यासाठी सदर जागेतील खारफुटीची कत्तल करण्यात आली. या स्टुडिओच्या माध्यमातून तब्बल १ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे, असा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली होती.

सदर स्टुडिओला दिलेली ६ महिन्याची मुदत १० जून रोजी संपली होती. मात्र त्यावर स्टुडिओकडून मुदतवाढ घेण्यात आली नाही. तसेच, सीआरझेडची परवानगीही घेण्यात आली नव्हती, असा आरोप भाजपतरर्फे करण्यात आला. मात्र,पालिकेकडून याप्रकरणी कोणतेही कारवाई न झाल्याने भाजपकडून खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखलकर व किरीट सोमय्या यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्टुडिओच्या ठिकाणी जोरदार ठिय्या आंदोलन केले. पालिकेने सदर स्टुडिओमधील शुटींग व वापर बंद करून त्यावर कारवाई करावी आणि स्टुडिओ जागेवरून हटविण्यात यावा, अशी मागणी केली होती. जोपर्यंत स्टुडिओवर पालिका कारवाई करणार नाही तोपर्यंत भाजप आंदोलन बंद करणार नाही, अशी आग्रही भूमिका भाजपने घेतली. या ठिकाणी पालिकेच्या पी/ उत्तर विभागाचे साहाय्याक आयुक्त किरण दिघावकर हे स्वतः उपस्थित होते. त्यांनी सर्व माहिती जाणून घेऊन सदर स्टुडिओला शूटिंग करणे व स्टुडिओचा वापर करणे बंद करण्याबाबत नोटीस बजावली.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -