घरमुंबईअनंत चतुर्दशीनिमित्त मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; नागरिकांना केल्या 'या' सूचना

अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; नागरिकांना केल्या ‘या’ सूचना

Subscribe

मुंबई : श्री गणेश चतुर्थीला मोठ्या जल्लोषात आगमन झालेल्या लाडक्या गणपती बाप्पांना गेल्या दहा दिवसांपासून नित्य पूजनअर्चन, धूप आरती, अगदी उपासतपास, मोदकांचा नैवेद्य अर्पण करून गणेशभक्तांकडून उद्या (28 सप्टेंबर) वाजतगाजत, गुलाल उधळत समुद्र, खाडी, तलाव आणि कृत्रिम तलावांत भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातही विसर्जनाची पूर्वतयारी सुरू आहे. तसेच, सालाबादप्रमाणे यंदाही मुंबई महापालिकेकडून गिरगाव, जुहू, दादर चौपाटी, पवई, शीतल तलाव आदी 69 नैसर्गिक स्थळी आणि 200 कृत्रिम तलावांच्या ठिकाणी गणेश विसर्जन निर्विघ्नपणे होण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी अगोदरच करण्यात आली आहे. या पूर्व तयारीबाबत अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज गिरगाव चौपाटी येथे सायंकाळच्या सुमारास भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. (Mumbai Municipal Corporation ready for Anant Chaturdashi Instructions to citizens)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवापूर्वीच सर्वसंबंधितांची बैठक घेऊन श्री गणेश आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, कचरा उचलणे, स्वच्छता राखणे, आगमन व विसर्जन निर्विघ्नपणे होण्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्व तयारी करण्याबाबत पालिका प्रशासनाला आदेश दिले होते. त्यानुसारच, महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी गणेशोत्सव पूर्व तयारीबाबत संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांची आणि संबंधित प्राधिकरणाची बैठक घेऊन आवश्यक ती कार्यवाही आणि उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.

- Advertisement -

हेही वाचा – मोठ्या गृहसंकुलात मतदान केंद्राची सुविधा; ‘या’ कारणासाठी निवडणूक आयोगाने घेतला निर्णय

आतापर्यंत दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. सुदैवाने अद्यापपर्यंत विसर्जन प्रसंगी एकही अप्रिय घटना घडलेली नाही. उद्या दहा दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे. गतवर्षी मुंबईत 69 नैसर्गिक व 191 कृत्रिम तलावांच्या ठिकाणी 6,647 सार्वजनिक आणि 31,259 घरगुती अशा एकूण 37,906 दहा दिवसांच्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यंदा दीड, पाच व सात दिवसांच्या गणेश मूर्तींच्या संख्येत काहीशी वाढ झालेली आहे. त्यामुळे यंदा दहा दिवसांच्या गणेश मूर्तींच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेची विसर्जन पूर्व तयारी

मुंबई महापालिकेने 69 नैसर्गिक तर, 200 कृत्रिम तलाव आदी 269 विसर्जन स्थळी गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी तब्बल 10 हजार कर्मचारी, 71 नियंत्रण कक्ष, समुद्र चौपाट्यांच्या ठिकाणी 468 स्टील प्लेट, छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी 46 जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था केली आहे. तसेच, समुद्र चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 764 जीवरक्षकांसह 48 मोटरबोटी तैनात केल्या आहेत. गणपतीला वाहण्यात आलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी 150 निर्माल्य कलशांसह 282 निर्माल्य वाहनांचीही सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 60 निरीक्षण मनोरे, महापालिकेच्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर 188 नियंत्रण कक्ष, प्रभावी प्रकाश योजनेसाठी ‘बेस्ट’ च्या सहकार्याने खांबांवर व उंच जागी सुमारे 1,083 फ्लडलाईट आणि 27 सर्चलाईट लावले आहेत. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी 121 फिरती प्रसाधनगृहं सज्ज ठेवण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहीत प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत. विविध ठिकाणी 68 स्वागत कक्ष, आरोग्य विभागाकडून 75 प्रथमोपचार केंद्रांसह 61 रुग्णवाहिकादेखील आदी यंत्रणेची तयारी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती उप आयुक्त (परिमंडळ 2) तथा गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.

हेही वाचा – Old Pension Scheme : ‘रामलिला’तून घुमणार जुन्या पेन्शन योजनेचा आवाज; सकारी कर्मचारी दिल्लीकडे

श्रीगणेश विसर्जनात धोकादायक 13 पुलांचा अडथळा

‘सुखकर्ता व दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया’ अशा श्रीविघ्नहर्ता अशा दहा दिवसांच्या विघ्नहर्ता श्रीगणेशाच्या विसर्जन मार्गावर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 13 धोकादायक पुलांचे विघ्न उभे ठाकले आहे. श्रीगणेश मूर्तींचे विशेषतः अवाढव्य, भव्य आणि खूपच उंच अशा मूर्तींच्या विसर्जन प्रसंगी मध्य रेल्वे मार्गावरील 4 आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 9 अशा एकूण 13 पुलांची स्थिती धोकादायक असल्यामुळे श्रीगणेश मूर्तींची विशेष काळजी घेण्यात यावी, अशी विनंती महापालिका प्रशासनाने श्रीगणेश मंडळे व गणेश भक्तांना केली आहे.

मूर्ती विसर्जन वेळ नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुविधा

श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांना सुविधा व्हावी, विसर्जनस्थळी एकाच वेळी गर्दी होवू नये, यासाठी मुंबई महापालिकेने https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर मूर्ती विसर्जन वेळ नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुविधा विकसित केली आहे. मायबीएमसी व्हॉट्सअप चॅटबॉट (MyBMC WhatsApp Chatbot) या 8999-22-8999 क्रमांकावरील चॅटबॉटमध्ये यंदा आपल्या नजीकचे गणेश मंडळ व मूर्ती विसर्जनस्थळ शोधण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

हेही वाचा – मोहित कंबोज यांचं सूचक वक्तव्य आणू शकते महायुतीत ‘दुरावा’; काय घडले असे?

विसर्जनादरम्यान घ्यावयाची काळजी

1) समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नये.
2) मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेमार्फत नेमलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी.
3) अंधार असणा-या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाणे टाळावे.
4) महापालिकेने पोहण्याकरीता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये.
5) समुद्रात किंवा तलावात कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित अग्निशमन दलाचे जवान, पोलीस किंवा जीवरक्षकांना कळवावे.
6) अफवा पसरवू नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
7) भाविकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात जाऊ देऊ नये.

समुद्रात मोठी भरती आणि ओहोटीवेळी नागरिकांनी काळजी घ्यावी

यंदा अनंत चतुर्दशी दिवशी म्हणजे उद्या (28 सप्टेंबर) समुद्रात सकाळी 11 वाजता 4.56 मीटरची भरती आहे. तसेच, सायंकाळी 5.08 वाजता 0.73 मीटरची ओहोटी असून रात्री 11.24 वाजता 4.48 मीटर उंचीची भरती असणार आहे.
तसेच, 29 सप्टेंबर रोजी पहाटे 5.15 मिनिटांनी 0.56 मीटरची ओहोटी, सकाळी 11.37 वाजता 4.71 मीटरची भरती, सायंकाळी 5.49 वाजता 0.36 मीटरची ओहोटी असेल. या भरती तसेच ओहोटीदरम्यान विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी- रामदास आठवले  

मत्स्यदंशापासून बचाव करा, वेळीच प्रथमोपचार घ्या

ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर अधिक दिसून येतो. या पार्श्वभूमीवर विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मत्स्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक 108 रूग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे.
1) ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.
2) ‘स्टींग रे’ किंवा ‘जेली फिश’चा दंश झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तत्काळ नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात किंवा रूग्णालयात जाऊन प्रथमोपचार घ्यावेत.
3) जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाकावे.
4) जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
5) मत्स्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढावी.
6) जखम झालेल्या जागी बर्फ लावावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -