‘फिट इंडिया’ अंतर्गत मुंबई महापालिका आयोजित करणार ‘अर्ध मॅरेथॉन’

मुंबई महापालिका क्षेत्रात विविध संस्थांद्वारे मॅरेथॉनसह वैविध्यपूर्ण क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने भाग घेणाऱ्या स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांचीही संख्या मोठी असते. ही बाब लक्षात घेता ‘फिट मुंबई बीएमसी हाफ मॅरेथॉन’ च्या ‘प्रोमो रन’च्या अनुषंगाने ‘आपत्ती व्यवस्थापन आराखडा’ तयार करण्याची सूचना आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात आली.

मुंबई : ‘फिट इंडिया’ मोहिमेच्या अंतर्गत आरोग्य विषयक जनजागृती साधण्यासाठी मुंबईमध्ये ‘अर्ध मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी या ‘अर्ध मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून, मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल चहल यांनी याबाबत आदेश दिले आहेत. (Mumbai Municipal Corporation to organize Half Marathon under Fit India)

मुंबई महापालिका क्षेत्रात विविध संस्थांद्वारे मॅरेथॉनसह वैविध्यपूर्ण क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने भाग घेणाऱ्या स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांचीही संख्या मोठी असते. ही बाब लक्षात घेता ‘फिट मुंबई बीएमसी हाफ मॅरेथॉन’ च्या ‘प्रोमो रन’च्या अनुषंगाने ‘आपत्ती व्यवस्थापन आराखडा’ तयार करण्याची सूचना आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात आली. या सुचनेचे सर्वांनी स्वागत केले. यामुळे पूर्वतयारीचा भाग म्हणून ‘आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा’ असणारी ‘फिट मुंबई बीएमसी हाफ मॅरेथॉन’ ही मुंबईतील पहिली क्रीडा स्पर्धा ठरणार आहे.

अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली मॅरेथॉनसाठीची पूर्वतयारी म्हणून ‘प्रोमो रन’ चे आयोजन करण्यात येणार आहे. हा क्रीडा उपक्रम ३ कि.मी., ५ कि.मी. व १० कि.मी. अशा ३ टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ५ हजार नागरिकांना नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या ‘फिट मुंबई बीएमसी हाफ मॅरेथॉन’ चे समन्वयक तथा एम/पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’ या मोहिमेची सुरुवात ऑगस्ट २०१९ मध्ये केली. आरोग्य, व्यायाम, विविध क्रीडाप्रकार याबाबत जनजागृती व्हावी आणि देशी क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ‘फिट इंडिया’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता.

‘फिट मुंबई बीएमसी हाफ मॅरेथॉन’ची पूर्वतयारी म्हणून २६ फेब्रुवारीमध्ये ‘प्रोमो रन’चे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. या ‘प्रोमो रन’ बाबत पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयात नुकतेच एक विशेष समन्वय बैठक पार पडली. या बैठकीला मुंबई पोलीस दल, वाहतूक पोलीस यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे व खात्यांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने वाहतूक पोलीस उप आयुक्त सुनिल बोंडे, मॅरेथॉन समन्वयक तथा एम/पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, ए विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवदास गुरव, मुंबई पोलीस दलाच्या प्रतिनिधी पूनम जाधव, आपत्कालीन व्यवस्थापन खात्याच्या प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे, मॅरेथॉन आयोजनातील तज्ज्ञ डॉ. भावना डियोरा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

‘अर्ध मॅरेथॉन’बाबतची माहिती

  • फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात होणाऱ्या ‘फिट मुंबई बीएमसी हाफ मॅरेथॉन’मध्ये मुंबईकर नागरिकांसह महापालिका, मुंबई पोलीस दल यांचे अधिकारी व कर्मचारी भाग घेणार आहेत.
  • या ‘प्रोमो रन’चा शुभारंभ २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.०० वाजता महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील सेल्फी पॉईट येथून होणार आहे.
  • प्रोमो रनचे आयोजन हे ३ कि.मी., ५ कि.मी. व १० कि.मी. अशा ३ टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे.
  • १० कि.मी. च्या टप्प्याची सुरुवात सकाळी ७.०० वाजता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
  • ५ कि.मी. च्या टप्प्याची सुरुवात सकाळी ७.१५ वाजता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
  • ३ कि.मी. टप्प्याची सुरुवात सकाळी ७.३० वाजता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
  • या ‘प्रोमो रन’ मध्ये भाग घेणाऱ्या सर्वांना स्वयंचलित संगणकीय पद्धतीने नोंद करणारे उपकरण देण्यात येणार आहे.
  • या उपकरणामध्ये धावण्यास सुरुवात केल्यापासून ते समापन रेषेपर्यंत (फिनिश लाईन) पोहोचण्यास किती वेळ लागला, याची निश्चित नोंद स्वयंचलित पद्धतीने होणार आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी दावोसमध्ये आत्तापर्यंत ८८ हजार ४२० कोटींचे करार