घरताज्या घडामोडीकोरोना काळात ‘एस.टी.’ला महापालिकेचा हात

कोरोना काळात ‘एस.टी.’ला महापालिकेचा हात

Subscribe

कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी ३० कोटी रुपयांचा खर्च, मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचाही भार महापालिकेच्या तिजोरीवर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकल सेवा बंद असल्याने महापालिकेसह राज्य शासनाच्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट बस आणि एस.टी. महामंडळाच्या बसेसची सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यासाठी एस.टी. महामंडळाला किलोमीटर दराप्रमाणे महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपये अदा केले आहेत. मात्र, महापालिकेसह रुग्णालयीन कर्मचाऱ्यांसाठी बसची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रवासाचाही भार महापालिकेच्या खांद्यावर सोपवण्यात आला. राज्य परिवहन सेवा ही सरकारची असून त्याच सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रवासाचा खर्च हा महापालिकेच्या तिजोरीतून वसूल केल्याने कोविडच्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी सरकारला घेता आली नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

कोविडच्या काळात अत्यावश्यक सेवेतील महापालिका, रुग्णालयीन, मंत्रालयीन इत्यादी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता विशेष बस सेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) यांच्यावतीने पुरवण्यात आल्या. यासाठी महापालिकेने एस.टी. महामंडळाला प्रति कि.मी ४४ रुपये निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागाकडून बस सेवाच्या घेण्यात आल्या. मुंबईतील लोकल सेवा बंद असल्याने अत्यावश्यक सेवा देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक एस.टी. महामंडळाकडून मुंबईमध्ये ११ ठिकाणांहून केली जात होती.  परंतु एस.टीला ही प्रवासाची सुविधा देण्यापूर्वीच महामंडळाला महापालिकेने २४ मार्च २०२०ला २ कोटी रुपये आगावू निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर ५ मे रोजी ३ कोटी रुपये याप्रमाणे ५ कोटी रुपये आगावू दिले होते.

- Advertisement -

महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेल्या एस.टीच्या बस सेवांमध्ये मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी प्रवास केला. एस.टी. महामंडळ हे सरकारच्या अधिपत्याखालील असताना त्यांना स्वत:च्या कर्मचाऱ्यांसाठी बसची सुविधा पुरवता आली नाही. उलट महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा उपलब्ध करून देतानाच त्यांनी ४४ रुपये किलोमीटरप्रमाणे महापालिकेकडून बस फेऱ्यांचे पैसे आकारले आणि त्यामध्ये आपल्याही कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास मिळवून दिला आणि त्याचा भार महामंडळाने महापालिकेच्या खांद्यावर टाकला.

एस.टी महामंडळाला महापालिकेने दिलेली रक्कम

२३ मार्च ते २० मे २०२० : १४ कोटी ६५ लाख रुपये
२१ मे ते २ जुलै २०२० : १६ कोटी ०९ लाख १२ हजार ६४२ रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -