मुंबई : अखेर बेस्ट उपक्रमाच्या 27 हजार कर्मचार्यांच्या बँक खात्यात 29 हजार रुपयांची बोनस रक्कम गुरुवारी जमा झाली आहे. बेस्ट कर्मचार्यांना दिवाळी संपल्यानंतर बोनसची रक्कम मिळाली असली तरी गेलेल्या दिवाळीचा आनंद काही उपभोगता येणार नाही. मात्र दिवाळी बोनसची रक्कम उशिराने का होईना हातात पडत असल्याने तेवढा दिलासा या बेस्ट कर्मचार्यांना मिळणार आहे. (mumbai news diwali bonus deposited bank account of best employees)
बेस्ट उपक्रम गेल्या काही वर्षांपासून तोट्यात सुरू आहे. बेस्टला स्वतःच्या कर्मचार्यांना निवृत्त झाल्यावर आवश्यक देणी देण्यासाठी आणि दरमहा वेतन देण्यासाठी आर्थिक चणचण भासत आहे. तसेच बेस्टवर कर्जाचा मोठा डोंगर आहे. उत्पन्न वाढत नाही, तर दुसरीकडे भाडेवाढ करण्यात बेस्टला राजकीय विरोध आडवा येतो. त्यामुळे उत्पन्न वाढ कशी करावी आणि दैनंदिन, मासिक खर्च कसा भागवावा याबाबत बेस्टसमोर यक्षप्रश्न उभा राहतो.
हेही वाचा – Cold Weather : येत्या तीन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा; सर्वाधिक तापमान कुठे?
बेस्टच्या उत्पन्नात काही केल्या अपेक्षित वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे बेस्ट उपक्रमाचे रडगाणे कधी दूर होणार, बेस्ट उपक्रम फायद्यात कधी येणार याची चिंता बेस्ट उपक्रमाच्या कर्मचार्यांना लागून राहिली आहे. मुंबई महापालिकेने दिवाळीपूर्वीच कर्मचार्यांच्या खात्यात 26 हजार रुपये बोनस रूपाने जमा केले होते, मात्र त्याचवेळी बेस्टच्या कर्मचार्यांना बोनस जाहीर करण्यात आला नाही. त्यातच वेळ निघून गेली आणि विधानसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे यंदाची दिवाळी बेस्ट कर्मचार्यांना काळी दिवाळी म्हणून साजरी करावी लागली. आता दिवाळी गेल्यानंतर महापालिकेने बेस्टच्या कर्मचार्यांसाठी बोनस देण्याकरिता 80 कोटी रुपयांची रक्कम दिली. त्यामुळे दिवाळी बोनस रक्कम देण्यासाठी महापालिकेने आणि ती उपलब्ध करण्यात बेस्ट उपक्रमाने विलंब केला. अखेर गुरुवारी 29 हजार रुपये सानुग्रह अनुदानाची रक्कम बेस्टच्या अधिकारी व कर्मचार्यांना मिळाली. ही रक्कम प्रत्येकाच्या खात्यात बेस्ट प्रशासनाने जमा केली.
हेही वाचा – Kabaddi : नोकरीसाठी राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत बोगस खेळाडूंचा भरणा; चौकशीची मागणी
एसटी कर्मचार्यांनाही दिलासा
गेल्या महिनाभरापासून राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे कर्मचारी दिवाळी भेटीची वाट पाहत होते. अखेर गुरुवारी एसटी कर्मचार्यांच्या बँक खात्यात दिवाळी भेट जमा झाल्याने त्यांना दिलासा मिळाला. एसटी कर्मचार्यांना यंदा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दिवाळी भेट मिळाली नाही. बेस्ट उपक्रमातील कर्मचार्यांप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांना दिवाळी झाल्यानंतरही बोनस मिळाला नव्हता. आचारसंहिता असल्यामुळे निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन दिवाळी भेट वितरित केली जाईल, असे स्पष्ट करीत बेस्ट उपक्रमाने निवडणूक आयोगाला विनंती पत्र पाठवले होते. त्याच धर्तीवर एसटी महामंडळाने निवडणूक आयोगाला विनंती पत्र पाठवले. एकीकडे बेस्ट उपक्रमाच्या बोनसचा तिढा सुटला, तर दुसरीकडे एसटी महामंडळातील 90 हजार कर्मचार्यांना 6 हजार रुपये दिवाळी भेट देण्यात आली. (mumbai news diwali bonus deposited bank account of best employees)
Edited by : Ashwini A. Bhatavdekar