घरमुंबईMumbai News : कुर्ला येथे इमारतीचा पाया खचला, पाण्याची टाकी कोसळली; 60...

Mumbai News : कुर्ला येथे इमारतीचा पाया खचला, पाण्याची टाकी कोसळली; 60 कुटुंबांना केले स्थलांतरित

Subscribe

मुंबई : कुर्ला पूर्वकडील नेहरु नगर येथे म्हाडाच्या एका इमारतीच्या पुनर्विकास कामाच्या अंतर्गत पायलिंगचे काम सुरु असताना बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे शेजारील मेघदूत इमारतीचा पाया खचला. त्यामुळे सदर इमारतीच्या टेरेसवर असलेली 50 हजार लिटरची पाण्याची टाकी कोसळली. इमारतीचा पाया खचल्याने धोकादायक स्थितीत आलेल्या मेघदूत इमारतीमधील तब्बल 60 कुटुंबांना युद्धपातळीवर सुरक्षित स्थळी स्थलांतरित हलवण्यात आल्याने ते बचावले आहेत. अन्यथा मोठी दुर्घटना घडून जिवीतहानी झाली असती. (Mumbai News Foundation of building collapsed in Kurla water tank collapsed 60 families were relocated)

हेही वाचा – Maharashtra Winter Session : हिवाळी अधिवेशनावर अवकाळी पावसाचे सावट

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला पूर्वकडील नेहरूनगर येथील नेहरूनगर ही म्हाडाच्या वसाहतीमधील इमारत क्रमांक 72 चे सध्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. सदर इमारतीच्या पायाचे खोदकाम सुरू असताना मागील बाजूस असलेल्या सात मजली मेघदूत या 73 क्रमांक असलेल्या इमारतीचा पाया अचानकपणे खचला. त्यामुळे या इमारतीची संरक्षक भिंत आणि सुमारे 50 हजार लिटरची पाण्याची टाकी कोसळली. या दुर्घटनेत इमारतीला धोका निर्माण झाल्याने तिथे राहणाऱ्या रहिवाश्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

सदर दुर्घटनेनंतर पालिकेच्या आपत्कालीन विभागाचे कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दल, महानगर गॅस व पालिकेच्या कुर्ला एल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र प्रसंगावधान राखून पूढे इमारत कोसळण्याची व त्यामुळे मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता लक्षात घेता युद्धपातळीवर सदर इमारतीमधील 60 कुटुंबातील नागरिकांना नजीकच्या समाज कल्याण केंद्राच्या जागेत सुरक्षितपणे नेण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती शिवसेनेचे (शिंदे गट) स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली. मात्र धोकादायक स्थितीत आलेली मेघदूत इमारत राहिवाशांना राहण्यासाठी सुरक्षित आहे की, नाही याबाबतचा निर्णय म्हाडा प्रशासन पाहणी केल्यावर घेणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र तोपर्यंत म्हाडाने तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आम्ही दिल्लीत गेल्यावर ‘कठपुतली’ म्हणणाऱ्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाकही…; एकनाथ शिंदे कडाडले

बिल्डरचा निष्काळजीपणा कारणीभूत

नेहरु नगर येथील म्हाडाची सदर वसाहत ही 50 वर्षांपेक्षाही जास्त जुनी आहे. काही इमारती धोकादायक स्थितीत आल्याचे बोलले जात असून त्या इमारतींचा तातडीने पुनर्विकास करणे गरजेचे झाले आहे. मात्र सदर वसाहतीमध्ये इमारतींची रचना दाटीवाटीची असल्याने इमारत पुनर्विकासाचे काम करताना विशेषतः पाया खोदकाम करताना बाजूच्या इमारतींना धक्का बसणार नाही व त्या धोकादायक स्थितीत येणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे होते. मात्र इमारत क्रमांक 72च्या पुनर्विकासाचे काम सुरू असताना संबंधित काम करणाऱ्या बिल्डरने व अभियंते यांनी शेजारील इमारत क्रमांक 73 ची काळजी घेतली नाही. पायाचे खोदकाम करताना बाजूच्या इमारतीचा पाया खचला व पाण्याची टाकी आणि संरक्षक भिंत कोसळली. या घटनेपूर्वी रहिवाशांनी सदर इमारतीच्या पायाचे खोदकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांभाळून काम करण्याबाबत अगोदरच बजावले होते. तरीही सदर दुर्घटना घडल्याने इमारत क्रमांक 73 मधील रहिवाशांनी या दुर्घटनेला बिल्डर व काम करणारे कर्मचारी यांना जबाबदार ठरवले असून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -