मुंबई : एका पोलीस निरीक्षकाने एका महिला तक्रारदाराची तक्रार लिहून न घेता तिला रात्रीच्या वेळी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे प्रकरण ज्यावेळी मुंबई उच्च न्यायालयात गेले, तेव्हा न्यायाधीशांनीया या पोलीस अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले. तसेच, पोलीस उपायुक्तांनी पुढच्या सुनावणीवेळी हजर राहून याबाबत कारवाईचे काय निर्देश दिले आहेत, हे सांगावे असे म्हटले आहेत. मुंबईतील समता नगर पोलीस ठाण्यातील हे पोलीस अधिकारी अधून तक्रारदार महिला घाटकोपर येथे राहणारी आहे. (Mumbai News Police send friend request to woman without taking complaint, Bombay High Court hears harsh words from the officer)
मिळालेल्या माहितीनुसार, याचिकाकर्त्या महिलेने सांगितल्यानुसार, तिचा तिच्या पतीसोबत वैवाहिक वाद होता आणि त्यामुळे ती घाटकोपर येथे वेगळी राहत होती. या दाम्पत्याची मुलगी कांदिवली येथे भाड्याच्या घरात राहत होती. ऑगस्ट 2024 मध्ये, जेव्हा याचिकाकर्ता महिलेची मुलगी घाटकोपर येथे तिच्यासोबत राहत होती. कारण तिच्या मुलीवर न्यूरोलॉजिकल शस्त्रक्रिया करण्यात आली होती, असे याचिकाकर्त्या महिलेने सांगितले. पण याचदरम्यान याचिकाकर्त्या महिलेच्या पतीने काही लोकांना पाठवले आणि तिची मुलगी राहात असलेल्या कांदिवलीच्या घरातील सामान त्या भाड्याच्या फ्लॅटमधून काढून टाकले.
याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या फ्लॅटमध्ये सुमारे 15 लाख रुपये रोख आणि तिचे अनेक सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने ठेवण्यात आले होते. परंतु ते सध्या तेथे नाहीत आणि अशा प्रकारे तिने समता नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना अनेक पत्रे लिहिली. चोरीच्या आरोपाखाली एफआयआर करा आणि जवाब नोंदवा, अशी विनंती सुद्धा केली. या याचिकाकर्त्या महिलेच्यावतीने वकील विजय कंथारिया आणि शुभदा साळवी यांनी न्यायालयात बाजू मांडत म्हटले की, पीएसआयने तक्रारदार महिलेची तक्रार नोंदवून घेतली नाही. उलट, या पोलीस अधिकाऱ्याने महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्याशिवाय, पीएसआय तक्रारदार महिलेला रात्री उशिरा तिचे म्हणणे नोंदवण्याच्या बहाण्याने फोन करत असे. याप्रकरणी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. ‘तुम्ही तपास करत असलेल्या प्रकरणात तक्रारदाराला फ्रेंड रिक्वेस्ट कशी पाठवू शकता?’ असे म्हणत न्यायमूर्तींनी पोलीस अधिकाऱ्याला चांगलेच सुनावले आहे.
हेही वाचा… BHARATPOL : इंटरपोलप्रमाणेच भारतपोलही देणार गुन्हेगारांची माहिती, शहांच्या हस्ते पोर्टलचे उद्घाटन
तर पीएसआयने तक्रारदार महिलेला चुकून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तसेच, पीएसआय हा नवीन अधिकारी आहे आणि त्याची ही पहिली पोस्टिंग आहे, असे अतिरिक्त सरकारी वकीलांकडून सांगण्यात आले. ज्यानंतर न्यायालयाने पीएसआयच्या कृतीवर चिंता व्यक्त करत म्हटले की, पोलीस अधिकाऱ्याचे हे कृत्य अस्वीकार्य आहे. तक्रारदारासोबत असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. असे वर्तन कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याकडून सहन केले जाऊ शकत नाही. तर, महत्त्वाची बाब म्हणजे, पोलीस अधिकाऱ्यांना सोशल मीडिया वापरण्याची परवानगी आहे का, असा सवालही न्यायालयाकडून उपस्थित करण्यात आला. ज्यावर सरकारी वकीलाने असा कोणताही अधिकार किंवा परवानगी नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता न्यायालयाने विभागीय पोलीस उपायुक्तांना पुढील सुनावणीत स्वतः हजर राहून पीएसआयवर करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 जानेवारीला होणार आहे