मुंबई : वाळकेश्वर परिसरातील प्रसिद्ध बाणगंगा तलाव व परिसराच्या जीर्णोद्धाराच्या कामात अडथळा ठरणारी 12 बांधकामे पालिकेच्या विभाग कार्यालयाने सामंजस्याने कारवाई करून हटवली आहेत. तसेच, सदर बाधित कुटुंबांचे नजीकच्या परिसरातच पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे आता बाणगंगा येथील 12 बांधकामे हटविल्याने जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा झाला आहे. (Mumbai Paving the way for the restoration of Banganga Lake and its surroundings 12 constructions deleted)
गेल्या अनेक वर्षांपासून बाणगंगा परिसरात 12 बांधकामे अस्तित्वात होती. मात्र बाणगंगा परिसराला धार्मिक स्थळाचा दर्जा असल्याने येथे शेकडो भाविक भेट देतात. त्यामुळे काळानुसार बसलेल्या परिस्थितीत बाणगंगा परिसराचा जीर्णोद्धार करणे आवश्यक झाले, मात्र त्यामध्ये सदर 12 बांधकामे अडथळा ठरत होती. त्यामुळे ही बांधकामे हटविल्याशिवाय पुढील कामे करणे अवघड होते. यास्तव सदर बांधकामे हत्विण्यासापूर्वी पालिकेने त्यात राहणाऱ्या कुटुंबांना नोटिसा दिल्या होत्या. तसेच, त्यांचे नजीकच्या परिसरातच पुनर्वसन करण्याची हमी दिली होती. त्यामुळेच पालिकेने अखेर सदर बांधकामे हटविण्याची कारवाई केली व तसेच, संबंधित कुटुंबीयांचे पुनर्वसन केले.
हेही वाचा – Politics : आधी अजितदादांना इशारा आता यू-टर्न; म्हाडाचे अध्यक्षपद मिळाल्यावर आढळराव नरमले!
वाळकेश्वर परिसरातील जीर्णोद्धार कामांमध्ये बाणगंगा तलाव व सभोवतालचा परिसर, रामकुंडालगतच्या परिसराची स्वच्छता, तलावाच्या पायऱ्यांची तसेच संरक्षक भिंतींची आणि दीपस्तंभाची दुरुस्ती व जीर्णोद्धार, तलावाचे आतील बांधकाम हटवणे, बटरफ्लाय झडप दुरुस्ती आणि सुधारणा अशा महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री तथा स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांनी या तलाव परिसरातील बांधकामे हटवून तलावाचा पुरातत्व वारसा जपण्याच्यादृष्टीने कामे हाती घेण्याचे महापालिकेला निर्देश दिले होते. त्यानुसार या जीर्णोद्धार कामांचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल तसेच अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी बाणगंगा परिसर जीर्णोद्धार कामांच्या निमित्ताने आवश्यक कार्यवाही वेगाने करण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये प्रामुख्याने जीर्णोद्धार कामांमध्ये अडथळा ठरणारी आणि मागील कित्येक वर्षांपासून असलेली बांधकामे हटवताना बृहन्मुंबई महानगरपालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) च्या माध्यमातून संयुक्तपणे पुनर्वसनाची कार्यवाही करण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मंजुरीनंतर बाणगंगा परिसरात राहणाऱ्या 12 कुटुंबांना नजीकच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या ठिकाणीच राहण्याचा पर्याय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून देण्यात येणार आहे. नागरिकांकडूनही या पुनर्वसनासाठीचे संमतीपत्र मिळाले आहे, अशी माहिती ‘डी’ विभागाने दिली आहे.
हेही वाचा – Uddhav Thackeray : गद्दारांना पन्नास खोक्यांचा हमीभाव, पण…; शेतकरी प्रश्नांवर ठाकरेंचा संताप
या प्रशासकीय प्रक्रियेनंतर सदर बांधकामांवर निष्कासन कार्यवाही करण्यात आली. त्याद्वारे आता मोकळी जागा उपलब्ध झाल्याने बाणगंगा परिसर प्रवेशासाठी तसेच याठिकाणी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी या जागेत दर्जेदार नागरी सुविधा देणे शक्य होईल. तसेच बाणगंगा परिसर स्वच्छ ठेवण्याच्या अनुषंगानेही हे महत्वाचे पाऊल आहे. बाणगंगा परिसरात पायऱ्यांच्या ठिकाणी हटवण्यात आलेल्या बांधकामांमुळे याठिकाणचा प्रवेश अतिशय सुरळीत होईल.
‘असे’ होणार जीर्णोद्धार
‘डी’ विभागातील विविध ऐतिहासिक ठिकाणांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. याच अंतर्गत बाणगंगा तलाव परिसर जीर्णोद्धाराचाही समावेश आहे. हा प्रकल्प “विशेष प्राधान्य प्रकल्प” म्हणून घोषित करण्यात आला आहे. वारसा स्थळांच्या यादीत ‘श्रेणी–1’ मध्ये समाविष्ट असणाऱ्या बाणगंगा परिसराला जीर्णोद्धार कामे पूर्ण झाल्यानंतर नवीन व आकर्षक रूप लाभणार आहे. उप आयुक्त (परिमंडळ 1) डॉ. संगीता हसनाळे यांच्या निर्देशाखाली व सहायक आयुक्त शरद उघडे यांच्या देखरेखीखाली ‘डी’ विभाग कार्यालयाच्यावतीने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील एक रस्ता ‘भक्ती मार्ग’ म्हणून विकसित करण्यात येत आहे. त्याचबरोबर साजेसे माहिती फलक, आकर्षक पथदिवे, वाराणसीतील विकास प्रकल्पाच्या धर्तीवर उद्याने, खुली बैठक व्यवस्था, विहार मार्ग इत्यादी बाबी देखील या प्रकल्पांतर्गत साकारण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तलाव आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असतील. तलाव परिसरातील पुरातन वास्तुंचे जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे. सदर कामे ही पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभाग संचालनालय यांच्या मार्गदर्शनानुसार व मुंबई वारसा संवर्धन समिती यांच्याशी समन्वय साधून करण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी पुरातन वास्तुतज्ज्ञ विकास दिलावरी हे सल्लागार आहेत. तसेच गौड सारस्वत ब्राह्मण ट्रस्टचे देखील या प्रकल्पाला सहकार्य लाभते आहे, अशी माहिती ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.