Club House App: क्लब हाऊस ॲपवर महिलांबद्दल अपमानास्पद, क्रूर गोष्टी केल्याप्रकरणी तिघांना हरयाणातून अटक

क्लब हाऊस ॲप ऑडिओ चॅटवर आधारित एक सोशल नेटवर्किंग ॲप आहे. या ॲपच्या माध्यमातून वापरकर्ते विविध मुद्द्यांवर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत चर्चा करतात.

सुल्ली डील्स आणि बुल्ली बाई ॲपनंतर ऑडिओ चॅट ॲप्लिकेशन ‘क्लब हाऊस’ ॲपमुळे आता खळबळ माजली आहे. क्लब हाऊस ॲपच्या चॅटवर मुस्लिम महिलांबाबत अपमानास्पद, क्रूर गोष्टी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने तातडीने कारवाई करून २४ तासांमध्ये आरोपींना हरयाणातून अटक केली आहे. याप्रकरणी तिघाजणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार, क्लब हाऊस ॲपवर दोन ग्रुपचा मॉडरेटर KLA XC ऊर्फ आकाश (वय १९) याला हरयाणाच्या करनालमधून अटक केली आहे. मुंबई सायबर पोलिसांना तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मिळाला आहे. यादरम्यान आरोपींना मुंबईत आणण्याची कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान आरोपी आकाश व्यतिरिक्त पोलिसांनी २१ वर्षीय जेशनव आणि यश पराशर यांना अटक केली आहे. या दोघांनाही ट्रांझिट रिमांडसाठी कोर्टात हजर केले जाईल.

मुस्लिम समाजातील महिलांविरोधात अश्लील आणि अपमानास्पद टिपणी करण्याबाबत मुस्लिम संघटना रजा अकादमीने मुंबई पोलिसांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली होती. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही मुंबई पोलिसांकडे मागणी केली की, बुल्ली बाईंच्या प्रकरणांतर क्लब हाऊस अॅप चालवणाऱ्यांवर कारवाई करावी.

मुंबई पोलीस सायबर विभागाच्या आयुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. सायबर पोलिसांनी कोणताही वेळ दवडता आरोपींना गजाआड केले. क्लब हाऊस ॲप ऑडिओ चॅटवर आधारित एक सोशल नेटवर्किंग ॲप आहे. या ॲपच्या माध्यमातून वापरकर्ते विविध मुद्द्यांवर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत चर्चा करतात.


हेही वाचा – Valentine Day दिवशी प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकराने क्राईम शो पाहून घरावर घातला दरोडा