मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदी जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला आहे. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला हा फोन आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (mumbai police control room received call regarding threat to kill pm narendra modi)
मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तिने फोन करून पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे. नुकताच राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच ठार मारण्याची धमकी देणारा फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – Congress Vs ECI : शेवटच्या टप्प्यात मतदान कसे वाढले, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मागितला पुरावा
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री एका महिलेने दूरध्वनी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले. हे सांगून तिने दूरध्वनी बंद केला. हा फोन आल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडाली. सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले. त्यानंतर या महिलेला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तिचा फोन बंद येत होता. अखेर मुंबई पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आणि फोन करणाऱ्या व्यक्तीचा तातडीने शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, दूरध्वनी करणाऱ्या महिलेचा शोध लागला असून तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत. प्राथमिक तपासात महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समोर आले आहे. 34 वर्षीय महिलेची पोलीस चौकशी करीत आहेत.
गेल्यावर्षीही अफवांचे सुमारे १०० दूरध्वनी मुंबई पोलिसांना आले होते. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात अशा धमक्यांच्या दूरध्वनीने शंभरी गाठली होती. नुकताच रिझर्व बँक ऑफ इंडियाला देखील धमकीचा एक फोन आला होता.
गेल्या सहा वर्षात पंतप्रधान मोदींना चार वेळा धमकी
गेल्या सहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळा जीवे मारण्याची धमकी आली आहे. पहिल्यांदा धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाला, तर दुसऱ्या वेळी केरळमध्ये एक पत्र मिळाले होते. तिसऱ्या वेळेस फोनवरून धमकी मिळाली होती आणि आता परत एकदा धमकीचा फोन आला आहे.
हेही वाचा – SS UBT Vs Chandrachud : सरन्यायाधीश चंद्रचूड आग लावून गेले आणि…, ठाकरे गटाचा पुन्हा एकदा निशाणा
Edited by : Ashwini A. Bhatavdekar