घरमुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध एकनाथ शिंदे संघर्ष तापला; मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध एकनाथ शिंदे संघर्ष तापला; मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश

Subscribe

शिवसेनेतील आमदार एक एक करून एकनाश शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने शिवसैनिक संतापले आहेत

राज्यात सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. एकनाथ शिंदे यांच्यासह 41 आमदारांनी बंडखोरी करत गुवाहाटीमध्ये एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. या आमदारांसह आता एकनाश शिंदे एक वेगळा गट निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची बंडखोर आमदारांना अपात्र जाहीर करण्यावर बैठक सुरु आहे. दरम्यान शिवसेनेत ठाकरेविरुद्ध शिंदे या दोन फुटीच्या राजकारणामुळे राज्यभरातील आक्रमक शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई, नाशिक, पुणे यांसारख्या ठिकाणी तोडफोडीच्या घटना सुरु आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी घेत मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

पोलीस आयुक्तांच्या बैठकीत निर्णय 

पोलीस आयुक्त आणि पोलीस सह आयुक्त यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने मुंबईतील सर्व अपर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उपआयुक्तांची बैठक झाली. अशा स्थितीत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतला.

बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवली

 मुंबईत कलम 144 लागू झाल्यानंतर एकाच ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे. लाऊडस्पीकरवर बंदी असेल. आमदार-खासदारांच्या कार्यालयांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांची राजकीय बॅनर आणि घोषणांवर नजर असेल. काही अपवाद वगळता, कलम 144 च्या निर्बंधातही सूट देण्यात आली आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंच्या जाहीर सभेला मात्र परवानगी 

यात मुंबई पोलिसांनी शहरात 144 कलम लागू केल्यानंतरही मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज संध्याकाळी होणाऱ्या जाहीर मेळाव्याला मुंबई पोलिसांची परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वांसाठी कायदा एक पण आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी कायदा दुसरा असे असा सवाल उपस्थित होत आहे.

 शिवसैनिक संतापले

शिवसेनेतील आमदार एक एक करून एकनाश शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने शिवसैनिक संतापले आहेत. त्यामुळे बंडखोर शिवसेना आमदारांच्या कार्यालयांना टार्गेट करून दगडफेकीच्या घटना घडत आहेत. मुंबईतील अनेक बंडखोर शिवसेना आमदारांच्या बॅनरवर काळे फासण्यात आले, तर ठिकठिकाणी निषेध मोर्चे निघाले, याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुंबईत आता जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. तर सर्व पक्षांच्या कार्यालयांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. याशिवाय सोशल मीडिया पोस्टमुळेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची सायबर टीम लक्ष ठेवून आहे.

 पोलिसांकडून शांततेचे आवाहन 

यामुळे चौकाचौकात बंडखोर आमदारांविरोधात किंवा पाठींब्यासाठीचे बॅनर पोस्टर तात्काळ काढण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. त्याचबरोबर सर्व पक्षांना आणि कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी शांततेचे आवाहन केलं आहे. बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या अनेक संदेशांमध्ये आज दुपारी ४ वाजता शिंदे यांचे समर्थक त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मोठ्या संख्येने जमणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने येथील रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.


महाविकास आघाडी भविष्यातही यशस्वीपणे काम करणार, बाळासाहेब थोरातांचा विश्वास


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -