मुंबई : लाखोंचे दागिने घेऊन पळून गेलेल्या दोघा चोरांना मुंबई पोलिसांनी एका विशेष बॅगेमुळे पकडले आहे. यामुळे जवळपास 17 लाखांचे दागिने देखील सापडले आहेत. (mumbai police nab two robbers with help of bag with gps chip)
सोमवारी रात्री एक व्यक्ती आपल्या एका नातेवाईकासह जवळपास 42 लाखांचे दागिने घेऊन दुचाकीवरून जात होता. सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळील डी-मेलो मार्गावर पोहोचले तेव्हा त्यांना चार अज्ञात व्यक्तींनी अडवले. त्यांना जबरदस्त मारहाण केली. आणि त्यांच्याकडील दागिन्यांची बॅग घेऊन पळून गेले.
हेही वाचा – Sudden Baldness : अजब आजाराने बुलढाण्यातील ग्रामस्थ हैराण…आधी डोक्याला येते खाज मग पडते टक्कल
याप्रकरणी पीडितांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींपैकी एकाने या दोघांवर कथितरित्या गोळ्या झाडल्या. तसेच सोन्याचे दागिने असलेली बॅग घेऊन ते घटनास्थळावरून पसार झाले.
या चोरांनी पळून जाताना आपला पाठलाग होऊ नये, यासाठी कथितरित्या गोळीबार केला. यात तक्रारदार व्यक्तीचा नातेवाईक जखमी झाला. यानंतर या दोघांनी थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी नेहमीप्रमाणे चोरांना पकडण्यासाठी काही पथके तयार केली.
पोलिसांनी सांगितले की, जी बॅग चोरीला गेली त्यात एक विशिष्ट प्रकारची चिप लावण्यात आली होती. ही चिप आणि सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलीस लागलीच या चोरांपर्यंत पोहोचले. लोकमान्य टिळक मार्ग येथून पोलिसांनी मंगळवारी सकाळी एकाला तर दुसऱ्याला डोंगरी येथून ताब्यात घेतले. या दोघांकडून पोलिसांनी 16.50 लाखांचे दागिने जप्त केले आहेत. पोलीस सध्या अन्य दोन आरोपींचा शोध घेत आहे.