Sushant Singh Rajput’s suicide case: मनोचिकित्सक, मानसशास्त्रज्ञासहीत इतर डॉक्टरांची चौकशी

sushant singh rajput
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत

सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी तीन वैद्यकीय अधिकार्‍यांसह चौघांची वांद्रे पोलिसांकडून चौकशी करुन जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यात तीन मनोचिकित्सकासह (Psychiatrist)  एका मानसशास्त्रज्ञाचा (Psychologist) समावेश आहे. या चौघांनी सुशांतवर उपचार केले होते. या वृत्ताला पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दुजोरा दिला आहे.

१४ जूनला सुशांतने आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्याकडे पोलिसांना सुसाइड नोट सापडली नव्हती, त्यामुळे त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नव्हते. सुशांत हा डिप्रेशनमध्ये होता, त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. मात्र या आत्महत्येमागे इतर काही कारण आहे का? याचा सध्या वांद्रे पोलिसांकडून तपास सुरु आहे. याच गुन्ह्यांत आतापर्यंत ३८ हून लोकांची पोलिसांनी चौकशी केली आहे. त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यात आदित्य चोप्रा, संजय लिला भन्साली, सुशांतची प्रेयसी रिया चक्रवती, बहिण, वडिलांसह मॅनेजर, नोकर, मित्रमंडळींचा समावेश आहे.

आता वांद्रे पोलिसांनी तीन मनोचिकित्सक आणि एका मानसशास्त्रज्ञाची जबानी नोंदवून घेतली आहे. त्यांच्याकडे सुशांत हा नोव्हेंबर २०१९ पासून उपचारासाठी जात होता. तो काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता. त्यावर त्यांच्याकडून उपचार सुरु होते. मात्र सुशांतला कुठले डिप्रेशन होते, याबाबत काहीही सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. या चौघांच्या चौकशीतून सुशांतवर योग्य उपचार सुरु होते, मात्र अचानक त्याने उपचाराला प्रतिसाद देणे बंद केले होते, असे बोलले जाते. सुशांतने आणखीन काही दिवस उपचाराला प्रतिसाद दिला असता तर त्यातून तो डिप्रेशनमधून बाहेर आला असता असे सांगण्यात आले.