दहाच्या नंतर फटाके फोडणाऱ्यांवर मुंबईत मोठी कारवाई

firecrackers bursting
दिवाळीच्या काळात आगीच्या घटना

सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजवण्यावर आखून दिलेली वेळ न पाळणाऱ्या अनेकांवर मागील दोन दिवसात मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत बहुतांश ठिकाणी गुन्हे दाखल न करता अनेकांवर दंडात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले आहे. या प्रकरणी शिवडी परिसरात ५ वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले असून ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

फटाके विक्रेत्याने उडवली कोर्टाची खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी फटाक्यावर बंदी न आणता सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजवण्यासाठी रात्री ८ ते १० ही वेळ आखून दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी या बद्दलच्या सूचना सर्वत्र देण्यात आल्या आहे. जी व्यक्ती रात्री १० नंतर फटाके वाजवतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या या आदेशाचे पालन व्हावे यासाठी मुंबई पोलिसांनी मागील दोन दिवसात मुंबईभर कारवाई सुरू केली. या कारवाईत मंगळवारी दोन अज्ञात तरुणांविरुद्ध ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान बुधवार आणि गुरुवारी रात्री शिवडी परिसरात रात्री दहानंतर फटाके वाजवणाऱ्यांवर ५ गुन्हे दाखल झाले आहे. रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली असून ८ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना जामिनावर सोडून देण्यात आले आहे. मात्र सोमवारी त्यांना स्थानिक न्यायालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आले असल्याची माहिती रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत बनसोड यांनी दिली.

फटाके वेळेतच उडवा; नाहीतर ८ दिवस तुरुंगात जा

दरम्यान मरीन ड्राइव्ह पोलिसांनी नरिमन पॉईंट या ठिकाणी रात्री दहा नंतर फटाके वाजवणाऱ्या ७ जणांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावर दंड आकारून सोडून देण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी दिली. दरम्यान पश्चिम आणि पूर्व उपनगरात आखून दिलेल्या वेळेनंतर फटाके वाजवणाऱ्यावर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, मात्र पोलिसांनी या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचे टाळले असल्याची माहिती समोर येत आहे.