घरमुंबईमध्य, हार्बर मार्गावर १८ पादचारी पूल धोकादायक; ६० वर्षाची कालमर्यादा ओलांडली

मध्य, हार्बर मार्गावर १८ पादचारी पूल धोकादायक; ६० वर्षाची कालमर्यादा ओलांडली

Subscribe

मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील १२५ पैकी १८ पूल धोकादायक असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी केलेल्या अर्जावर मध्य रेल्वेनेच ही माहिती दिली आहे.

अंधेरीच्या गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर पुलाची तपासणी सुरु असतानाच मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील १२५ पैकी १८ पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. तसेच या रेल्वे पुलांनी ६० वर्षाची कालमर्यादा ओलांडल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. मात्र, तरीही हे पादचारी पूल सुरक्षित आाणि मजबूत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

गोखले पुल दर्घटनेनंतर इतर पुलांची केली पहाणी

अंधेरीतील गोखले पुलाचा मोठा भाग गेल्या महिन्यात कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेमध्ये २ पादचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर रेल्वेमार्गावरील पुलांच्या मजबुतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वे तसेच महापालिका प्रशासनाने इतर पुलांची पाहणी देखील केली. असे असतानाच मध्य रेल्वेवरील १८ पादचारी पूल कालमर्यादा झाले असल्याचे माहिती अधिकारातून मागवलेल्या माहितीद्वारे समोर आले आहे.

- Advertisement -

माहिती अधिकारातून झाले उघड

या पुलांना ६० वर्षाची कमाल कालमर्यादा देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही या पुलांचा वापर सुरूच आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी केलेल्या अर्जावर मध्य रेल्वेनेच ही माहिती दिली आहे. यामध्ये मस्जीद बंदर स्थानकातील (सीएसएमटीच्या दिशेने), भायखळा (कल्याण दिशेने), दादर स्थानक (सीएसएमटी दिशेने व कल्याण दिशेने असे दोन पूल), माटुंगा स्थानक (सीएसएमटी दिशेने), कुर्ला (सीएसएमटी दिशेने), भांडुप स्थानकातील मधला पूल, मुंब्रा स्थानकातील मधला पूल तसेच ठाकुर्ली, कल्याण, दिवा, वाशिंद, आसनगाव, बदलापूर (मधल्या भागातील), वांगणी, कर्जत, शिवडी, डॉकयार्ड स्थानकांतील पुलांचा समावेश आहे. १८ पुलांपैकी साधारण १२ पूल, तर स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत.

पुलांनी ६० वर्षाची कालमर्यादा ओलांडली

दरम्यान, पादचारी पुलांबरोबरच मध्य रेल्वे हद्दीत असणाऱ्या ७१ उड्डाणपुलांपैकी १४ पूल हे स्वातंत्र्यापूर्वीचे आहेत. त्यांची कालमर्यादा मात्र रेल्वेकडून देण्यात आलेली नाही. यामधील सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान असलेला कर्नाक पुलाला १४९ वर्षे पूर्ण झाली आहेत. मध्य रेल्वेवरील हा सर्वात जुना उड्डाणपूल असून त्यानंतर सॅण्डहर्स्ट रोड ते भायखळा दरम्यान ओलीवंट, भायखळा उड्डाणपुलासह गार्डन पूल, करी रोडजवळील आर्थर, आणि अन्य पूल आहेत. ६० वर्षांची कालमर्यादा काही पुलांनी ओलांडली असून त्यांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नसल्याचंही माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -