घरमुंबईMumbai Rains : हिवाळ्यात अवकाळी पावसाची हजेरी; स्वेटर घालायचे की रेनकोट?

Mumbai Rains : हिवाळ्यात अवकाळी पावसाची हजेरी; स्वेटर घालायचे की रेनकोट?

Subscribe

ग्लोबल वार्मिंगमुळे ऋतूंमध्ये बदल घडत आहेत. हिवाळ्यात पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळपासूनच मुंबईसह काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची संततधार बघायला मिळाली. त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. हिवाळ्यातील या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे अंगात स्वेटर घालावे की रेनकोट असा संभ्रम निर्माण झालाय. मात्र बहुतांश मुंबईकरांनी हातात छत्री घेऊनच कामासाठी घराबाहेर पडणे पसंत केले.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यातील रत्नागिरी, नाशिक, रायगड आदी जिल्ह्यात तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यापैकी आज बुधवारचा पहिलाच दिवस संततधार पावसाने गाजवला. सकाळपासूनच नागरिकांनी हातात छत्री घेतली. मात्र पाऊस दिवसभर लांबल्याने संध्याकाळी कामावरून घरी परत जातानाही छत्रीचा वापर करावा लागला. काही जणांनी रेनकोट घातल्याचे निदर्शनास आले.

- Advertisement -

सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत शहर भागात – ८.८४ मिमी, पूर्व उपनगरात – ५.५८ मिमी तर पश्चिम उपनगरात – ६.६७ मिमी इतक्या पावसाची नोंद पालिका आपत्कालीन विभागाच्या पर्जन्यजलमापक यंत्रावर करण्यात आली. तर दुपारी २ ते सायंकाळी ६ या कालावधीत जास्त पाऊस शहर भागात पडला. शहर भागात – १६.४६ मिमी, पूर्व उपनगरात – ११.५४ मिमी तर पश्चिम उपनगरात – ११.५८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दादर भागात २०.८२ मिमी, विक्रोळी भागात – २२.३५ मिमी तर दहिसर भागात – २०.८२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

पालघरसाठी ऑरेंज अलर्ट

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबई, ठाणे, धुळे आणि पालघरमध्ये हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता. तसेच, मुंबई, ठाणे जिल्हयासाठी यलो अलर्ट आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. बुधवारी सकाळपासूनच पावसाच्या संततधारेला सुरुवात झाली. पावसाळी ढगांचे वातावरण, संततधार पाऊस बघून मुंबईकर सकाळीच छत्री, रेनकोट घेऊन बाहेर पडले. मात्र सकाळपासून सायंकाळपर्यंत शहर भागात जास्त प्रमाणात पाऊस पडला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -