Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणारच; महापालिका आयुक्तांचे अजब वक्तव्य

Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणारच; महापालिका आयुक्तांचे अजब वक्तव्य

गेल्या १२ तासांत मुंबईमध्ये १४० मिमी ते १६० मिमी इतका पाऊस झाला आहे.

Related Story

- Advertisement -

मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांची पावसाळ्यातील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याची क्षमता कमी असल्याने (समुद्रात पाणी वाहून नेण्याची क्षमता) अतिवृष्टी झाल्यास काही तासांसाठी मुंबईत पाणी तुंबणारच, असे अजब वक्तव्य मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केले आहे. मुंबईत बुधवारी हिंदमाता, सायन सर्कल, किंग्जसर्कल या सखल भागात पाणी साचले. आयुक्त इकबाल सिंग चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी या भागाची भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर आयुक्त चहल यांनी पालिका आपत्कालिन विभागाला भेट दिली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, गेल्या १२ तासांत मुंबईमध्ये १४० मिमी ते १६० मिमी इतका पाऊस झाला आहे. जर २४ तासांत ५०० मिमी इतका पाऊस पडला, तर त्याला अतिवृष्टी म्हणतात. मात्र, एका तासातच १०० मिमीपेक्षाही जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी काही तास लागणारच.

…त्यानंतर हिंदमाता येथे पाणी साचणार नाही

- Advertisement -

हिंदमाता येथे पाणी साचू नये यासाठी पालिकेने आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या असून काम प्रगतीपथावर आहे. हिंदमाता येथे साचणारे पावसाचे पाणी साठवण्यासाठी पालिका भूमिगत टाक्या बांधत आहे. त्यामध्ये पावसाचे पाणी साठवून पुढे त्याचा नीटपणे निचरा करण्यात येणार आहे. १४० कोटींचा भूमिगत प्रकल्प सुरू असून दीड किलोमीटरचा प्रकल्प पूर्ण व्हायला ३० दिवस लागणार आहेत. त्यानंतर भविष्यात हिंदमाता येथे पावसाचे पाणी कधीच साचणार नाही, असा दावा आयुक्तांनी केला.

पालिकेने हिंदमाता परिसरात केलेल्या विविध उपाययोजननांमुळे यंदा जरी येथे काही प्रमाणात पाणी साचले असले, तरी गेल्या १५ वर्षांत प्रथमच वाहतूक थांबली नाही. तसेच सायन गांधी मार्केट येथे मोठी पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतले असून त्यामुळे भविष्यात गांधी मार्केटच्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचणार नाही, असे आयुक्त म्हणाले. त्याचप्रमाणे मोगरा पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर अंधेरी सब-वेमध्ये पाणी साचण्याचा प्रकार बंद होईल, असेही आयुक्तांनी सांगितले. दहिसर, सायन आणि चुनाभट्टी वगळता रेल्वे ट्रॅकवर पाणी तुंबलेले नाही, असेही आयुक्त म्हणाले.

- Advertisement -