Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Mumbai Rains : मुंबईत पावसाची बॅटिंग सुरूच! रेल्वे वाहतुकीवर परिणाम; झाड पडून...

Mumbai Rains : मुंबईत पावसाची बॅटिंग सुरूच! रेल्वे वाहतुकीवर परिणाम; झाड पडून एक जखमी

मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी रेल्वे स्थानकादरम्यानची वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती.

Related Story

- Advertisement -

मुंबईला रविवारी झोडपून काढणाऱ्या पावसाने सोमवारीही (आज) मुंबई उपनगरात जोरदार बॅटिंग सुरू ठेवली. पावसामुळे सकाळच्या सुमारास मुलुंडच्या नवघर येथे झाड पडून एक जण जखमी झाला. तसेच मुंबईच्या सीमेला लागून असलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पावसाचे पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे सेवेवर त्याचा परिणाम होऊन वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी रेल्वे स्थानकादरम्यानची वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती. परंतु, ठाणे ते कर्जत, कसारा या दरम्यान रेल्वे सेवा सुरू होती. दुपारनंतर मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक थोडी विलंबाने परंतु सुरळीत झाली.

दरम्यान, सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीत शहर भागात – ३०.६९ मिमी, पूर्व उपनगरात – ४७.८२ मिमी आणि पश्चिम उपनगरात – ६१.३६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. पुढील २४ तासांत शहर आणि उपनगरांत मध्यम ते जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisement -

तसेच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर, एलबीएस मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. मुलुंड येथील सोनापूर भागात रस्त्यावर पाणी साचले होते. त्याचा त्रास वाहनचालक, वाहक यांना झाला. त्याचप्रमाणे मुलुंड येथील काही सोसायट्यांमध्ये, तसेच निर्मल लाईफ स्टाईल मॉलबाहेरील भागात पावसाचे पाणी साचले होते.

झाड दुर्घटनेत एकजण जखमी

उपनगरात सकाळी पावसाचा जोर होता. सकाळी ९ वाजताच्या सुमारास मुलुंड (पूर्व) नवघर व्हिलेज, लेन क्र. २, येथे झाड अंगावर पडल्याने धनाजी अंबा हाथीयानी (३१) ही व्यक्ती जखमी झाली. त्यांना तात्काळ स्थानिक नागरिकांनी नजीकच्या हिरामुंगी या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले.

दहिसर नदीला उधाण

- Advertisement -

सोमवारी सकाळपासून पश्चिम उपनगरात चांगला पाऊस पडला. बोरिवली, कांदिवली, मालाड, दहिसर भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे दहिसर नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला आणि नदीला उधाण आले होते. त्यामुळे नदी किनारच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच वरळी येथील बीडीडी चाळीत पावसाचा जोर वाढल्याने काही प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे रहिवाशांना त्रास झाला.

गोवंडी आणि विक्रोळी येथील २०० नागरिकांचे स्थलांतर

रविवारी चेंबूर येथे भिंत घरांवर कोसळून १९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झाले. विक्रोळी येथेही दरड कोसळून १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि १ जण जखमी झाला. भांडुप येथे घराच्या पडझडीत एक जण मृत पावला. तसेच चांदीवली येथे दरड कोसळून २ जण जखमी झाले. तर इलेक्ट्रिक शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला. विविध दुर्घटनांत ३२ जणांचा मृत्यू झाला. सदर ठिकाणी पुन्हा काही दुर्घटना घडू नये व त्यामध्ये जीवित किंवा वित्तीय हानी होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने चेंबूर येथील न्यू भारत नगर परिसरातील ३८ घरांत राहणाऱ्या १४५ नागरिकांचे, तसेच विक्रोळी सूर्यनगर परिसरातील ३० नागरिकांचे तात्काळ स्थलांतर केले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी तीन ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनांची गंभीर दखल घेऊन सरकारी आणि पालिका यंत्रणेला यापुढे अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी यंत्रणा आदी अलर्ट झाल्या आहेत.

- Advertisement -