Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई धक्कादायक! राजावाडी रुग्णालयात बेशुद्ध रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; चौकशीचे आदेश

धक्कादायक! राजावाडी रुग्णालयात बेशुद्ध रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; चौकशीचे आदेश

Related Story

- Advertisement -

घाटकोपर (पूर्व) येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात आयसीयू कक्षात मेंदूज्वर व लिव्हर या आजाराने त्रस्त श्रीनिवास यल्लपा (२४) हा तरुण बेशुद्ध अवस्थेत आयसीयूमध्ये उपचार घेत असताना उंदराने त्याच्या डाव्या डोळ्याचा काही भाग कुरतडल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी, या प्रकरणी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

महापौरांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भेट दिली व पाहणी केली. सदर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये , यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. घाटकोपर येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात श्रीनिवास यल्लपा (२४) या तरुणाला मेंदूज्वर व लिव्हरचा त्रास असल्याने व त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी दोन दिवसांपूर्वीच दाखल करण्यात आले व त्याला आयसीयू विभागात ठेवण्यात आले होते. त्यावेळी तो बेधुद्ध अवस्थेत होता. मात्र त्याच्या डाव्या डोळयाचा काही भाग उंदराने कुरतडल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

- Advertisement -

त्याच्या डोळ्याच्या खालील भागातून रक्त निघत असल्याचे पाहून त्याचे नातेवाईक हादरले. त्यांनी तात्काळ नर्स, डॉक्टर यांना पाचारण केले. त्याच्या डोळ्यांची नीटपणे तपासणी केली असता त्याच्या डाव्या डोळ्याचा भाग उंदराने कुरतडला असल्याचे निदर्शनास आले. तसेच, याप्रकरणी राजावाडी रुग्णालय अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांनी, या रुग्णालयात काही ठिकाणी उंदरांचा वावर असल्याचे मान्य करीत उंदरानेच डोळा कुरतडल्याचा निष्कर्ष काढला.

चौकशी व उपाययोजना करण्याचे आदेश

राजावाडी रुग्णालयात उंदराने रुग्णाच्या डोळ्याचा भाग कुरतडला असल्याची गंभीर घटना घडली असून आपण अधिष्ठाता डॉ.विद्या ठाकूर यांच्याकडून माहिती घेतली आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी, या घटनेप्रकरणी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
वास्तविक, अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजावाडी रुग्णालयात आयसीयू विभाग तळमजल्याला असून तेथे काही भागात उंदरांचा वावर असल्याचे सांगितले. मात्र रुग्णालय प्रशासनाने उंदरांचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रतिबंधित उपाययोजना केल्या आहेत; मात्र तरीही सदर घटना घडल्याने त्याची गंभीर दखल घेण्यात आली असून आणखीन कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याचे महापौरांनी सांगितले.

२०१७ रोजी महिला रुग्णांचे डोळे कुरतडल्याची घटना

- Advertisement -

पश्चिम उपनगरातील कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (जुने शताब्दी) रुग्णालयात ८ ऑक्टो २०१७ रोजी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शांता जाधव या महिलेच्या पायाला तर प्रमिला नेरूळकर या महिलेच्या डोळ्यांना उंदराने कुरतडल्याची घटना घडली होती. भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी, या घटनेची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाला वाचा फोडत पालिकेने सदर महिला रुग्णांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी घटनास्थळी पाहणी करून विविध उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. तर १२ ऑक्टोबर रोजी सदर घटनेचे तीव्र पडसाद पालिका सभागृहात उमटले होते. काँग्रेस नगरसेवक आश्रफ आजमी यांनी, आरोग्याच्या विषयावर चर्चा घडवून आणली असताना नगरसेवक कमलेश यादव यांनी भर सभागृहात उंदीर ठेवलेला लोखंडी पिंजरा आणला होता. त्यावर तत्कालीन महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी, त्यांना पिंजऱ्यासह बाहेर जाण्यास सांगितले होते.


भारत बायोटेकची Covaxin तिसर्‍या टप्प्यात ७७.८ टक्के प्रभावी; कंपनीचा दावा

- Advertisement -