Delta Plus Variant: लसीचे दोन डोस घेतलेल्या महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू

corona

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे कोरोना निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. मुंबईत देखील अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र अशा दिलायादायक परिस्थितीत आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. या मृत्यू मागचं आणखीन काय कारण आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

माहितीनुसार, मुंबईतील ६३ वर्षीय महिलेचा कोरोनाच्या डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला आहे. घाटकोपरमध्ये राहणारी ही महिला असून तिची २१ जुलैला चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर २४ जुलैला तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तीन दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला. पहिल्यांदा तिला विक्रोळीतील गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मग तिला ब्रीच कँडी रुग्णालय दाखल केले आणि तिथेच तिचा २७ जुलैला मृत्यू झाला. महत्त्वाची बाब म्हणजे या मृत्यू झालेल्या महिलेने कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, डेल्टा प्लसमुळे मृत्यू झालेल्या महिलेला आधीपासूनच फुफ्फुसाचा आजार होतो. त्यात तिला कोरोना झाला आणि त्यातून ती रिकव्हर होऊ शकली नाही. महिलेच्या संपर्कात आलेल्यांचे नमुन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. डेल्टा प्लस हा वेगाने पसरणार व्हेरियंट असल्यामुळे मुंबईतील आजूबाजूच्या परिसरात सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

राज्यात कोणत्या जिल्हात किती डेल्टा प्लसचे रुग्ण?

जळगाव – १३ रुग्ण
रत्नागिरी – १२ रुग्ण
मुंबई – ११ रुग्ण
पुणे, ठाणे – प्रत्येकी ६ रुग्ण
पालघर – ३ रुग्ण
गोंदिया, नांदेड, रायगड – २ रुग्ण
चंद्रपूर, अकोला, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, कोल्हापूर आणि बीड – प्रत्येकी १ रुग्ण