मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भाडेतत्वावर चालवल्या जाणाऱ्या बेस्ट बसमध्ये आग लागल्याची घटना घडली. मुंबईतील भायखळा येथे मंगळवारी (31 डिसेंबर) बेस्ट बसला आग लागली, बसमधून अचानक धूर येऊ लागला. ही बस भायखळ्यावरुन जिजामाता उद्यानच्या दिशेने जात होती, यावेळी हा अपघात घडला. मात्र चालक आणि वाहकाने प्रसंगावधान दाखवत शहाणपणामुळे बस तत्काळ थांबवून सर्व प्रवाशांना बाहेर काढलं. त्यामुळे सर्व प्रवासी सुखरूप आहेत, ही दिलासादायक बाब आहे. आग लागल्यानंतर बसमध्ये काही काळ गोंधळ उडाला.
बेस्ट बसला आग
ज्या बसला आग लागली ती बस मार्ग क्रमांक 126 वर होती, या बसचा क्रमांक 8337 आहे. ही बस जिजामाता उद्यानात जाणाऱ्या प्रवाशांना घेऊन भायखळ्यावरुन निघाली होती. त्याचदरम्यान, या बसच्या छताला आग लागली आणि बसमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र चालक आणि कंडक्टर यांनी प्रसंगावधान दाखवत, बस थांबवून सर्व प्रवाशांना बसच्याखाली उतरवले आणि सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले, त्यामुळे जीवितहानी टळली.
या घटनेनंतर बेस्टच्या प्रवक्त्याने बसमध्ये आग लागल्याची पुष्टी केली असून, “प्राथमिक माहितीवरून असे दिसून आले आहे की बस ओव्हरहेड वायरला धडकली, त्यानंतर काळा धूर निघू लागला आणि बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप बाहेर पडले आणि या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर, अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, अपघाताच्या कारणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
ऑलेक्ट्रा कंपनीकडून इलेक्ट्रिक बसची निर्मिती
या बसची निर्मिती ऑलेक्ट्राने केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या महिन्याच्या सुरुवातीला कुर्ल्यात बसचा मोठा अपघात झाला होता. या बसची निर्मितीही याच कंपनीने केली आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) त्यांच्या बहुतांश ई-बस खाजगी कंत्राटदारांकडून ओल्या भाडेतत्त्वावर भाड्याने घेते.
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, फोन कॉल आल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पाठवण्यात आले. यापूर्वी सोमवारी वांद्रे स्टेशन (पूर्व) ते मुलुंड (पूर्व) दरम्यान मार्ग क्रमांक 303 वर धावणाऱ्या धारावी आगाराच्या बेस्ट बसला आग लागली. घाटकोपरमधील गांधीनगर जंक्शन येथे ही आगीची घटना घडली.
(हेही वाचा : IRCTC Down : तत्काळ बुकिंगच्या वेळेसच होते रेल्वेची वेबसाइट ठप्प; प्रवासी त्रस्त, महिन्याभरातील तिसरी घटना )
Edited By- Prajakta Parab