घरताज्या घडामोडीमुंबईकरांसाठी व्हॅलेंटाईन गिफ्ट; बहूचर्चित रो रो सेवा मुंबईत दाखल

मुंबईकरांसाठी व्हॅलेंटाईन गिफ्ट; बहूचर्चित रो रो सेवा मुंबईत दाखल

Subscribe

व्हॅलेंटाइन डे निमित्त मुंबईकरांना प्रेमाचे प्रतिक असलेल्या लाल रंगाचे गिफ्ट मिळाले आहे. अर्थात हे गिफ्ट म्हणजे बहूचर्चित असलेली लाल रंगाची रोरो बोट. रोरो बोट शुक्रवारी मुंबईत दाखल झाली असून भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान धावणार आहे. सोमवार (दि. १७ फेब्रुवारी) पासून या बोटीची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर २९ फेब्रुवारी रोजी बोटीचे उद्घाटन होईल आणि १ मार्च पासून प्रवाशांच्या सेवेत ही बोट दाखल होणार आहे.

सागरमाला उपक्रमांतर्गत देशातील समुद्रकिनाऱ्याचा उपयोग करून जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली आहे. त्यामाध्यमातून मुंबईत रो-रो सेवा सुरु होणार होती. याची घोषणा तीन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र अनेक अडचणींवर मात करत अखेर मुंबईकरांच्या सेवेत ही बोट दाखल झाली आहे. भारतातील शिपिंग क्षेत्रातील एस्कॉयर शिपिंग ऍण्ड ट्रेडिंग कंपनी ही रोरो बोट चालविणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी या कंपनीची असणार आहे. ही रोरो बोट अत्याधुनिक पद्धतीने तयार केली आहे. यात सर्व सुविधा असणार आहे. या रोरो बोटीची प्रवासी क्षमता ५०० असून चार चाकी गाड्यांची क्षमता १८० एवढी आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार या बोटीचे प्रवासी भाडे प्रती प्रवाशी २३५ रुपये असणार आहे. तर चार चाकीचे भाडे हे एक हजार ते दिड हजार असणार असल्याची माहिती मिळाली आहे. या रोरो बोटीची किंमत साधारणता: ५५ कोटी आहे. ग्रीसमध्ये या बोटीची बांधणी केली गेली आहे. या बोटीत प्रवासी सुरक्षेचा सर्व सुविधा तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बोट चालविण्याची जबाबदारी प्रशिक्षित चालकांवर असणार आहे. या बोटीला मुंबईत येण्याकरीता तब्बल १८ दिवसांचा कालावधी लागला.

लाल रंगाची बोट आणि प्रेमाचा इतिहास

- Advertisement -

मुंबईकरांना अनेक दिवसापासून या रोरो बोटीची प्रतिक्षा लागली होती. मात्र अखेर एस्कॉयर शिपिंग ऍण्ड ट्रेडिंग कंपनीने ही बोट मुंबईत व्हॅलेंटाइन डे चा दिवशी दाखल केली. यामागचे कारणही तसेच आहे. कारण या बोटीचा पुर्णपणे रंग लाल आहे. लाल रंग हा प्रेमाचे प्रतिक असल्यामुळे ही रोरो बोट २८ जानेवारीला ग्रीसवरून निघाली. शुक्रवारी १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाइन डे निमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे दाखल झाली. त्यामुळे मुंबईकरांना व्हॅलेंटाइन डे निमित्त हे गिफ्ट मिळाले आहे, अशी माहिती कंपनीचा एका अधिकार्‍यांनी दैनिक आपलं महानगरला दिली आहे.

रोरोला का झाला होता उशिर

तीन वर्षांपूर्वी रोरो बोटीची घोषणा करण्यात आली होती. भाऊचा धक्का, मांडवा, नवी मुंबईतील नेरुळ या त्रिकोणात रो-रो सेवा (प्रवासी आणि वाहनांची वाहतूक) सुरू करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. हा प्रकल्प सप्टेंबर २०१८ मध्येही सुरू होणार होता. रोरो बोटी चालविण्यासाठी एका कंपनीशी महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाबरोबर करार झाला होता. मात्र, बोर्डाकडून दिलेल्या वेळेत कंपनी रो-रो बोटी आणू न शकल्याने करार रद्द झाला आहे. त्यांनतर महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने नवीन निविदा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पुर्वी करार झालेली कंपनी न्यायालयात गेली. न्यायालयीन तिढा सुटल्यानंतर अखेर १४ फेब्रुवारी २०२० होजी ही बोट मुंबईत दाखल झाली आहे.

वेळेची होणार बचत

मुंबईतून अलिबाग-मांडवा याठिकाणी जायचे असेल तर तीन ते साडेतीन तासांचा वेळ लागतो. त्यातून अधिक डोकेदुखी म्हणजे ट्राफिक. वेळ आणि प्रदूषण या समस्याना प्रवाशांना तोंड द्यावं लागतं. मात्र आता या रोरो बोटीमुळे मुंबई-मांडवा हे अंतर चार तासांवरून एका तासावर येणार आहे. रो-रो सेवेमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी टळणार असून इंधन बचतीमुळे प्रदूषणाचे प्रमाणही कमी होणार आहे.

 

रोरो बोट मुंबईत दाखल झाली आहे. या बोटीच्या डागडुजीच्या कामासह जहाजाच्या नोंदणीचे काम येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण केले जाईल. त्यानंतर जहाजाची चाचणीही घेण्यात येणार आहे. मार्च महिन्यातील पहिल्या आठवडयात ही रोरो बोट प्रत्यक्षात प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. – रामा स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -