घरमुंबईजून अखेरपर्यंत पाऊस नाही... पालिकेची चिंता वाढली!

जून अखेरपर्यंत पाऊस नाही… पालिकेची चिंता वाढली!

Subscribe

जून अखेरपर्यंत शहरात मान्सूनच्या पावसाला सुरवात न झाल्याने शहराला पाणी पुरवठा करण्याबाबत पालिका चिंतेत पडली आहे.

जून महिना संपत आला तरी पावसाचा अद्याप काही पत्ता नाही. पावसाच्या मोसमात मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावांमधील पाणी आटत चालले आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणार्‍या राज्य सरकारच्या ताब्यातील भातसा व अप्पर वैतरणा तलावातील पाण्याच्या पातळीने तळ गाठल्याने मागील काही दिवसांपासून या तलावातील राखीव कोट्यातून पाणी उचलले जात आहे. मात्र, महापालिकेच्या तलावांमधील राखीव कोट्याला अद्यापही हात लावला नसला तरी लांबलेल्या पावसामुळे महापालिकेची चिंता अधिकच वाढली आहे.

किमान दोन महिने राखीव पाणीसाठ्याचा वापर नाही 

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. ठाणे जिल्ह्यातील भातसा व नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलावातील पाण्याच्या पातळीने पाणी पुरवठा करण्याची किमान पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या तलावात असलेल्या राखीव कोट्यातून शहराला दररोज सुमारे २ हजार ४५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे. पालिकेच्या मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा या प्रमुख तलावासह तुलसी व विहार तलावात अजून ७३ हजार ७८४दशलक्ष लिटर्स इतका पाणीसाठा आहे. यापैकी मोडक सागरमध्ये ३४ हजार ३६४ दशलक्ष लिटर व मध्य वैतरणा तलावात ३३ हजार ४८० दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. या दोन तलावातून सध्या दररोज सुमारे ८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे किमान दोन महिने तरी या तलावातील राखीव पाणी साठ्याला हात लावावा लागणार नसल्याचे जलअभियंता विभागाच्या एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.

- Advertisement -

पाणी कपातीत वाढ करण्याचा निर्णय नाही

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस लागेल अशी अपेक्षा होती. पण संपूर्ण जून महिनाच कोरडा गेला. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळीने अजूनच तळ गाठला आहे. २०१८ मध्ये २६ जून रोजी तलावातील पाणीसाठी २ लाख ५३ हजार दशलक्ष लिटर एवढा होता. यावेळी १ लाख ८० हजार दशलक्ष लिटरने पाणीसाठा कमी असल्यामुळे पाऊस पडणे आवश्यक आहे. मात्र अद्यापपर्यंत पाणी कपातीत वाढ करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

तलावातील पातळी (दशलक्ष लिटरमध्ये)

अप्पर वैतरणा – राखीव कोट्यातून पाणी पुरवठा
भातसा – राखीव कोट्यातून पाणी पुरवठा
तानसा – २,७८२
मोडक सागर – ३४,३६४
मध्य वैतरणा – ३३,४८०
विहार – १,१९८
तुळसी – १,९६०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -