घरफिचर्समायमहानगर ब्लॉगनिकाल गोंधळ ते रँकिंग - मुंबई विद्यापीठाचा प्रवास

निकाल गोंधळ ते रँकिंग – मुंबई विद्यापीठाचा प्रवास

Subscribe

नुकत्याच जाहीर झालेल्या या क्यूएस ग्रॅज्युएट एम्प्लॉयबिलिटी रँकिंगनुसार देशातील पारंपरिक विद्यापीठाच्या यादीत मुंबई विद्यापीठ प्रथम आले. देशातील सर्वोत्तम रोजगारक्षम शिक्षण देणार्‍या संस्थांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने आपली मोहोर उमटवली आहे. या रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाचे जागतिक स्थान २५२ ते ३०० च्या दरम्यान आहे. मुंबई विद्यापीठाने गेल्या पाच वर्षांत भरीव कामगिरी केली आहे. याचे सर्व क्रेडिट हे विद्यापीठाला विशेष करून विद्यापीठाचे नवे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांना द्यायला हवे. कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी बजावलेली ही कामगिरी अत्यंत मोलाची आहे.

अलीकडेच क्यूएसने जाहीर केलेल्या ग्रॅज्युएट एम्प्लॉयबिलिटी रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाने देशातील पारंपरिक विद्यापीठांमध्ये प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला. या रँकिंगनंतर सध्या विद्यापीठात आनंदाचे वातावरण पसरले आहे. निकाल गोंधळ, हॉलतिकीट गोंधळ, ऑनलाईन पेपर तपासणीचा झालेला फियास्को या सगळ्यावर मात करत मुंबई विद्यापीठाने अनेक वर्षांची आपली कसर भरून काढली खरी. याचे कौतुक तर करायलाच हवे, पण अजून बराच पल्ला मुंबई विद्यापीठाला गाठायचा आहे, हे मात्र खरे आहे. निकाल गोंधळ ते रँकिंगमध्ये झालेली सुधारणा या प्रवासाचा आजच्या शिक्षण कट्ट्यावर घेतलेला आढावा.

मुंबई विद्यापीठ जागतिक रँकिंगमध्ये सुधारणा करणार कधी? हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारल्या जाणार्‍या सर्वाधिक प्रश्नांपैकी एक होता. गेल्या अनेक वर्षांत क्वाकरेली सायमंड (क्यूएस) सारख्या जागतिक पातळीवरील रँकिंगमध्ये विद्यापीठ वारंवार नापास होत असल्याचे दिसून आले. अनेक वेळा तर त्यात मुंबई विद्यापीठाने अर्ज केला नाही तर काही वेळा विद्यापीठ त्यासाठी पात्रच ठरले नाही. मात्र, आता मुंबई विद्यापीठाने त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला खोडून काढले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या या क्यूएस ग्रॅज्युएट एम्प्लॉयबिलिटी रँकिंगनुसार देशातील पारंपरिक विद्यापीठाच्या यादीत मुंबई विद्यापीठ प्रथम आले. देशातील सर्वोत्तम रोजगारक्षम शिक्षण देणार्‍या संस्थांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने आपली मोहोर उमटवली आहे. या रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाचे जागतिक स्थान २५२ ते ३०० च्या दरम्यान आहे. भारतात सातव्या क्रमांकाची संस्था होण्याचा बहुमान विद्यापीठाला मिळाला आहे. क्यूएसने जाहीर केलेल्या इंडिकेटरनुसार एम्प्लॉयर रेप्युटेशन २९२, एलूमनाई आऊटकम ४१, एम्प्लॉयर स्टुडंट्स कनेक्शन २०१+ , पार्टनरशिप विथ एम्प्लॉयर २०१+ ग्रॅज्युअट एम्प्लॉयमेंट रेट हा २०१ हून अधिक असल्याची नोंद घेण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद घेत १०० पैकी ८७.२ एवढे गुण विद्यापीठाला बहाल करण्यात आले आहेत. मुंबई विद्यापीठाने गेल्या पाच वर्षांत भरीव कामगिरी केली आहे. याचे सर्व क्रेडिट हे विद्यापीठाला विशेष करून विद्यापीठाचे नवे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांना द्यायला हवे. कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी बजावलेली ही कामगिरी अत्यंत मोलाची आहे.

- Advertisement -

आज मुंबई विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत. गेल्या पाच वर्षांत विद्यापीठात १०४ टक्क्यांनी पदवी आणि ११२ टक्क्यांनी पद्व्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. तर दूरस्थ शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत १४७ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यवसायाभिमुख शिक्षणाची कास धरणार्‍या मुंबई विद्यापीठाने व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम, नावीन्यपूर्ण शिक्षणक्रम, आदर्श महाविद्यालये सुरू केले आहेत, तर विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाबरोबरच पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम सुरू केले असल्याने मुंबई विद्यापीठाला इथपर्यंत मजल मारता आली आहे. याशिवाय मुंबई विद्यापीठाने कॅम्पसमधून हद्दपार झालेल्या संशोधनास चालना दिलेली आहे. यासाठी विद्यापीठात इनक्युबेशन सेंटरची उभारणी करण्यात आली. त्यात ‘स्टार्ट अप’ साठीही प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून संशोधनाची कमी झालेली मात्रा आता गतिमान होऊ लागल्याने मुंबई विद्यापीठाची गाडी रुळावर आल्याचे अधोरेखित करायला हवे.

एकीकडे रँकिंगमध्ये सुधारणा झाली असतानाच गेल्या अनेक वर्षांपासून निकाल गोंधळाचा ठपका देखील यंदा मुंबई विद्यापीठाने पुसून काढला आहे. गेल्या सत्र परीक्षांपासून मुंबई विद्यापीठाने त्यांचे निकाल वेळेवर लावण्यास परीक्षा विभागाचे प्रयत्न उपयुक्त ठरले आहेत. मुळात काही दिवसांपूर्वी निकाल उशिराने लागत असल्याने कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी यात जातीने लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. जिल्ह्यानुसार त्यांनी मुख्याध्यापकांचा बैठका घेत त्यांना दीडपट पेपर तपासणी करण्याच्या सक्तीने निकाल गोंधळावर मार्ग काढला. कुलगुरूंनी स्वतः प्राचार्य म्हणून काम केले होते, त्यांनी त्यांचा तोच अनुभव याठिकाणी वापरला. पेपर तपासणी वेळेत पूर्ण न करणार्‍या महाविद्यालयांना नोटिसा पाठविण्यापासून ते त्यांच्या अतिरिक्त तुकड्यांचा प्रश्न मार्गी न लावल्याने अनेक महाविद्यालयांनी त्यांना निकाल वेळेत लावण्यासाठी मदत केली खरी. त्याशिवाय पेडणेकर यांनी परीक्षा विभागाकडे जातीने लक्ष देत हा कठीण पेपर सोपा करून घेतला. या निकाल गोंधळाप्रमाणेच त्यांनी हॉल तिकीट गोंधळदेखील कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचे लॉगिन जवळपास दहा दिवस अगोदरपासून देण्यास सुरुवात केली. त्याचादेखील त्यांना उपयोग झाल्याने यंदा हॉलतिकिटांचा गोंधळ कमी झाल्याचे दिसून आले.

- Advertisement -

निकाल गोंधळ, हॉलतिकीट गोंधळ यातून मार्ग काढला असला तरी अद्याप विद्यापीठाला बराच पल्ला गाठायचा आहे, ही बाजूदेखील नाकारून चालणार नाही. विद्यापीठाने निकाल गोंधळावर मार्ग काढला असला तरी विद्यापीठातील पुनर्मूल्यांकनासारखे प्रश्न त्याचबरोबर प्रशासकीय गोंधळातून विद्यापीठाची सुटका झालेली नाही. आजही विद्यापीठात विद्यार्थी केंद्रित सुविधांचा अभाव दिसून येतो. विद्यापीठात विद्यार्थ्यांना आवश्यक अशा सिंगल विंडो सिस्टिम आजही कार्यरत नाही. हे विद्यापीठाला मान्य करावे लागेल. कलिना आणि फोर्ट कॅम्पस येथे कर्मचार्‍यांचा अपुर्‍या वर्गामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या खेपा मारव्या लागतात. याबरोबरच विद्यापीठातील सुरक्षेचा प्रश्न आजही गंभीर आहे. विद्यापीठात आजही काही ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे, यात तिळमात्र शंका नाही. याशिवाय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न आजही सुटलेला नाही. विद्यापीठाचे मादाम कामा वसतिगृह गेल्या अनेक वर्षांपासून बांधून तयार आहे. मात्र, अद्याप ते विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आलेले नाही. इतकेच नव्हे तर आजही कलिना कॅम्पस येथील काही वसतिगृहांचा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. आजही क्रीडा भवनासारख्या अनेक ठिकाणांची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. उपकेंद्राचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्याशिवाय महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये असलेली दरी मिटलेली नाही. आजही अनेक महाविद्यालयांच्या अनेक नियमांना फाटा देत अनेकांना स्वायत्ततेची ओढ लागली आहे. यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं विद्यापीठाला शोधायची आहेत. हे विसरून नक्कीच चालणार नाही.

मुळात रुईया महाविद्यालयांच्या प्राचार्य पदाचा असलेला दांडगा अनुभव डॉ. सुहास पेडणेकरांनी कामी आणत मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक गाडा हाकण्यास सुरुवात केली. ज्याचा फायदा आज मुंबई विद्यापीठाला झाला. पण आजही प्रशासकीय बाबतीत मुंबई विद्यापीठ म्हणावे तितके प्रगत झाले आहे असे पूर्णतः म्हणता येणार नाही. आजही नॅक मूल्यांकनासारखी महत्त्वाची परीक्षा पेडणेकरांना द्यायची आहे. संशोधनाचा पेपर काठावर पास झाला असला तरी आयआयटी मुंबईसारखी संशोधनाची परंपरा मुंबई विद्यापीठात सुरू करायची आहे. याशिवाय इतर अनेक प्रश्नपत्रिका डॉ. सुहास पेडणेकर यांच्यासमोर येणार असून त्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतरच ढासळत असलेला राजाबाई टॉवर हा विद्यापीठातच नेटाने उभा राहिला आहे, असं छातीठोकपणे म्हणता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -