Vile Parle Fire : मुंबईत आगीचे सत्र सुरुच; विलेपार्ले परिसरातील प्राईम मॉलला भीषण आग

Mumbai Vile Parle Fire Fire at Prime Mall in Vile Parle West; 12 fire engines on spot to douse the flames
Vile Parle Fire : मुंबईत आगीचे सत्र सुरुच; विलेपार्ले परिसरातील प्राईम मॉलला भीषण आग

मुंबईतील पवई परिसरातील आगीच्या घटनेला २४ तास उलटत नाही तोवर मुंबई पुन्हा एकदा आगीची घटना समोर आली आहे. मुंबईतील विलेपार्ले परिसरातील इर्ला रोड येथील प्राइम मॉलला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी १०.३० च्या सुमारास ही आगीची घटना घडलीय. ही आग इतकी भीषण आहे की, परिसरात दूरपर्यंत धुराचे लोट पाहायला मिळत होते. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या आहेत.

आगीची भीषणता पाहता इर्ला रोड परिसरातील रस्ते वाहतूक बंद करण्यात आली आहे. या परिसरात नेहमी नागरिकांच्या गर्दीने आणि वाहतूकीमुळे गजबजलेला असतो. धक्कादायक बाब म्हणजे या मॉलच्या जवळचं कपूर रुग्णालय देखील आहे. या मॉलमध्ये मोठ्याप्रमाणात कपड्यांची आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने आहेत. मात्र आगीच्या घटनेमागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

दरम्यान अग्निशमन दलाने ही आग लेवल चारची असल्याचे जाहीर केले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जम्बो टँकर ७, फायर इंजिन १०, श्वसन उपकरण वाहन १, कंट्रोल पोस्ट १ एवढे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.  १८ नोव्हेंबरला मुंबईतील पवई परिसरातही ह्युंडाईच्या शोरुमला भीषण आग लागल्याची घटना घडली होती.

गुरुवारी पवईत अग्नितांडव

पवई परिसरातील साकी विहार रोडवरील एका सर्विस सेंटरला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी घडली होती. पवईतील साई ह्युंडाई कंपनीच्या सर्विस सेंटरलमध्ये ही भीषण आग लागल्याची माहिती समोर आली होती. या आगीमुळे जवळच्या महावीर क्लासिक इमारतीत राहणाऱ्या रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीच्या ठिकाणाहून मोठ्या स्फोटांचेही आवाज येत होते. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या आगीत सर्विस सेंटरमधील कोट्यावधींच्या गाड्या जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही आग सर्विस सेंटरमध्ये पसरली असून काही लोकं याठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. ही आग इतकी भीषण होती की, परिसरात सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत आहे. धुराचे हे लोट २० ते ३० फूट उंचावर पसरत होते.