Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईला पाणीपुरवठा करणारा भातसा तलाव 100 टक्के भरला; अप्पर वैतरणाही भरणार

मुंबईला पाणीपुरवठा करणारा भातसा तलाव 100 टक्के भरला; अप्पर वैतरणाही भरणार

Subscribe

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडक सागर, तानसा, तुळशी हे तीन तलाव १३ – १६ जुलै कालावधीत भरून वाहू लागले होते. तर विहार तलाव हा ११ ऑगस्टला भरून वाहू लागला होता. विघ्नहर्ता गणपती बाप्पाने जाता जाता मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत मुंबईवरील पाणीकपातीचे विघ्न दूर केले आहे. भातसा तलाव मंगळवार १३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत १०० टक्के भरला आहे. विशेष म्हणजे अप्पर वैतरणा तलावात सध्या ९८.७३ टक्के पाणीसाठा जमा झाला असून या तलावांत पुढील २४ किंवा ४८ तासात चांगला पाऊस पडल्यास हा तलावही कोणत्याही क्षणी भरून वाहू लागेल.

त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एकूण पाच तलाव आता भरले असून सहावा अप्पर वैतरणा तलावही भरण्याच्या मार्गावर आहे. उरलेला फक्त एक तलाव म्हणजे मध्य वैतरणा तलावांत सध्या ९६.४५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला आता पुढील पावसाळ्यापर्यंत पाण्याचे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा या मुंबई शहराबाहेरील ( ठाणे जिल्हा परिसर) पाच तलावांतून आणि मुंबईतील विहार व तुळशी या दोन तलावांतून अशा एकूण सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, मुंबई महापालिका आपल्या ठाणे, भिवंडी व निजामपूर महापालिका हद्दीत दररोज १५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करते. मुंबईची वर्षभराची तहान भागविण्यासाठी पावसाळा संपल्यावर म्हणजे दरवर्षीच्या १ ऑक्टोबरच्या सुमारास सात तलावांत १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते.

जूनमध्ये लादलेली १० टक्के पाणी कपात रद्द

- Advertisement -

यंदा जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत तलाव क्षेत्रात ७० टक्के कमी पाऊस पडला होता. त्यामुळे साहजिकच सर्वच सात तलावातील पाणीसाठ्याने तलावांचा तळ झपाट्याने गाठायला सुरुवात केली होती. परिणामी मुंबई महापालिकेचे टेन्शनमध्ये आली. पालिकेने तलावातील उपलब्ध अवघा १० टक्के पाणीसाठा पाहता २७ जूनपासून मुंबईकरांवर १० टक्के पाणीकपात लादली होती. सुदैवाने पुढील अवघ्या १४ दिवसात तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडला आणि पाणीसाठ्यात तब्बल २ लाख ३४ हजार दशलक्ष लिटरने वाढ झाली. त्यामुळे भाजप पक्षाने पाणीकपात रद्द करण्याची मागणी करताच आयुक्त इकबाल चहल यांनी तातडीने चहलपहल करीत मुंबईकरांवरील १० टक्के पाणीकपात ८ जुलै राजी रद्द करून मुंबईकरांना मोठा दिलासा दिला.

एका महिन्यात चार तलाव ओव्हर फ्लो

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडक सागर तलाव १३ जुलै रोजी दुपारी १.०४ वाजता ओसंडून वाहू लागला होता. त्यानंतर तानसा तलावही १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता भरून वाहू लागला. १६ जुलै रोजी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास तुळशी तलावही भरून वाहू लागला. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजता विहार तलावही भरून वाहू लागला. गेल्या ९ ते १२ सप्टेंबर (सकाळी ६ पर्यंत) या कालावधीत भातसा तलावांत ८६ मिमी इतका पाऊस पडला व तलाव १०० टक्के भरला. तसेच, मोडक सागर, विहार व तुळशी तलावही १०० टक्के भरले आहेत तर तानसा तलाव ९९.९१ टक्के भरलेला आहे. अप्पर वैतणा तलावांत सध्या ९८.७३ टक्के (२,२४,१५४ दशलक्ष लिटर) इतका पाणीसाठा असून चांगला पाऊस पडल्यास कोणत्याही क्षणी भरून वाहू लागेल.

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत भातसामध्ये जास्त पाणीसाठा

- Advertisement -

भातसा तलावांत १२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत ७ लाख १७ हजार ३७ दशलक्ष लिटर इतका म्हणजे १०० टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षी म्हणजे १२ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ६ पर्यन्त भातसा तलावांत ७ लाख ६ हजार ८८६ दशलक्ष लिटर इतका म्हणजे ९८.५८ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला होता. तसेच, १२ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ६ पर्यन्त भातसा तलावांत ७ लाख २ हजार ४९६ दशलक्ष लिटर इतका म्हणजे ९७.९७ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला होता. त्यामुळे यंदा भातसा तलावातील पाणीसाठ्यात दीड ते दोन टक्के जास्त पाणीसाठा जमा होऊन तलाव १०० टक्के भरला.

सात तलावातील पाणीसाठा, टक्केवारी –

तलाव पाणीसाठा टक्केवारी
————- ———— —————————-
उच्च वैतरणा २,२४,१५४ ९८.७३

मोडकसागर १,२८,९२५ १००.००

तानसा १,४४,९४६ ९९.९१

मध्य वैतरणा १,८६,६६१ ९६.४५

भातसा ७,१७,०३७ १००.००

विहार २७,६९८ १००.००

तुळशी ८,०४६ १००.००
———————————————————-
एकूण १४,३७,४६७ ९९.३२


…तर बापाच्या जागी बाळासाहेबांचं नाव लावा, बंडखोर आमदारांना भास्कर जाधव यांचं आव्हान


- Advertisment -