मुंबईकरांची मास्क लावून बाजारात गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

देशभरात व विशेषत महाराष्ट्रात लॉकडाऊन असतानाही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच जी व्यक्ती मास्क न लावता बाहेर फिरेल तिला अटक करण्याचे आदेशच महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. यामुळे लोकांवर जरब बसेल त्यांना कोरोनाची गंभीरता समजेल हा त्यामागचा हेतू आहे. पण मुंबईतील अनेक भागात या आदेशाचा अर्थ मास्क घालून घराबाहेर जाऊ शकतो असा काढत नागरिकांनी बाजारात गर्दी केली. बोरीवली ,अंधेरी, सायन येथे  सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचेही पाहावयास मिळाले.

’साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार ‘महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२०’ अन्वये हे आदेश बुधवारी देण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कच्या सक्ती बरोबरच सोशल डिस्ट्नसिंग ठेवा असेही आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. यामुळे नागरिकांनी मास्क खरेदीसाठी मेडीकलमध्ये गर्दी केली होती. पण गुरुवारी मात्र सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासत रोजच्या तुलनेत अधिक नागरिकांनी मास्क घालून बाजारात गर्दी केली होती. यातील काहीजण तर मास्क लावून फेरफटका मारण्याच्या अर्विभावात वावरत होते. काहीजणांनी या आदेशाचा अर्थ मास्क घालून फिरण्यास हरकत नाही असा काढल्याचे सांगितले. यामुळे आयुक्तांच्या आदेशाचा अर्थ किती मुंबईकरांना कळाला हा प्रश्नच असून मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.