पालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत केली संयुक्त पाहणी

Municipal Additional Commissioner P. Velarasu conducted a joint inspection with railway officials
Municipal Additional Commissioner P. Velarasu conducted a joint inspection with railway officials

पावसाळा तोंडावर आलेला असताना पालिका व रेल्वे मार्गावर नालेसफाई कामांची लगबग सुरू आहे. पालिका अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी रविवारी मध्य रेल्वे मार्गावरील नालेसफाईच्या कामांची रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी, पालिका प्रशासनाने रेल्वेच्या नालेसफाई कामांबाबत समाधान व्यक्त केले.

मुंबईत पावसाळ्यात पाणी साचून रेल्वे व रस्ते वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम होऊन मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी महापालिका कंत्राटदारांमार्फ़त आपल्या हद्दीतील नद्या व नाले यांची साफसफाई करून घेते. तसेच, रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पालिका दरवर्षी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रेल्वे प्राधिकरणाच्या मार्फत नाले, कलव्हर्ट यांची साफसफाई करून घेते त्यासाठी पालिका रेल्वेला अडीच ते तीन कोटींचा निधी देते.

त्यामुळे रेल्वे आपल्या हद्दीतील नाले व कलव्हर्ट यांची खासगी कंत्राटदारांमार्फ़त साफसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर करवून घेते. मात्र रेल्वेकडून नालेसफाईची कामे कशी व कुठे कुठे सुरु आहेत, सफाई कामे किती टक्के झाली, याबाबत पालिका प्रशासन नियमित आढावा घेत असते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड स्थानक दरम्यान महापालिका हद्दीत, पावसाळापूर्व उपाययोजनांचा भाग म्हणून, महापालिका आणि मध्य रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून उपनगरीय लोहमार्गावर रुळाखालील नाल्यांच्या प्रवाहामधून गाळ काढणे, लोहमार्गाची स्वच्छता करणे ही कामे वेगाने केली जात आहेत, अशी माहिती पालिकेतर्फे देण्यात आली.

या कामांची महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) सुरेश पाखारे यांनी रविवारी सकाळच्या सुमारास रेल्वेच्या विशेष बोगीतून प्रवास करून संयुक्त पाहणी केली. रेल्वे रूळखालील कल्वर्ट आणि रेल्वे रुळांवर झालेली चांगली स्वच्छता पाहून पथकाने समाधान व्यक्त केले.