घरमुंबईमहापालिका आयुक्तांनी भरला माहुल रवानगीचा दम

महापालिका आयुक्तांनी भरला माहुल रवानगीचा दम

Subscribe

खामकर मंडईत मासळीविक्रेत्यांचे आंदोलन

मासळी विकण्यासाठी पर्यायी जागेवर मुकाट्याने जा, नाहीतर माहुलला रवानगी करू, असा सज्जड दम मुंबई महापालिका आयुक्तांनी आम्हाला भरला आहे. लोअर परळच्या दादासाहेब खामकर मंडईतील मासळी विक्रेत्या कोळी महिलांनी मुंबई महानगर पालिकेच्या कारभाराचा जाहीर निषेध करत बुधवारी एक दिवसाचे आंदोलनही केले. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन अतिशय कठोरपणे वागत असल्याचाही आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. स्थानिक आणि महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या अधिकार्‍यांच्या झालेल्या बैठकीत केंद्राच्या कायद्याचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा वापर करून संपूर्ण मासळी मार्केट तोडण्यात येईल, असेही अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

लोअर परळच्या रेल ओव्हर ब्रिजच्या कामाच्यावेळी रेल्वे प्रशासनाने ब्रिज खालील जागा कमी करण्याची मागणी मुंबई महापालिकाकडे केली आहे. रेल्वे पुलाच्या बांधणीसाठी आवश्यक असलेली जागा देण्यासाठी मासळी विक्रेते दुकानदार द्यायला तयार आहेत. पण सरसकट मंडई हटवून दुसर्‍या धोकादायक ठिकाणी हलवण्याची काहीच गरज नसल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण जबरदस्तीने मुंबई महापालिकेने चालवलेल्या कारभाराविरोधात आहोत, अशी भूमिका या कोळी महिलांनी मांडली आहे. म्हाडाच्या इमारतीखाली तयार केलेली मंडई ही धोकादायक स्थितीत असल्यानेच याआधी त्रिशुळ मंडई पाडल्यावर याठिकाणी कोळी महिलांनी मासळी विक्री करण्यास विरोध केला होता. पण मुंबई महापालिकेने आता १७३ परवानाधारक दुकानदारांच्या पोटावर पाय देण्याची तयारी सुरू केली आहे. जवळपास ९१ मासळी विक्रेत्या महिलांचा व्यवसाय हा लोअर परळ पुलाखाली चालतो.

- Advertisement -

अनेक कुटुंबातील चवथी पिढी आता मासळी विक्रीच्या व्यवसायात आहे. अचानक महापालिकेने पुल दुरूस्तीचे कारण देत संपुर्ण मंडईचे स्थलांतर हा कॉर्पोरेट कंपन्यांसाठीची सोय करण्यासारखे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. लोअर परळच्या कामासाठी रेल्वेला आवश्यक असलेली जागा नेमकी किती लागणार आहे यासाठी महापालिका कोणताही खुलासा करत नाही. जोपर्यंत लेखी कोणतही आश्वासन मिळत नाही तोपर्यंत पर्यायी जागेवर जाणार नाही. शिवाय स्थलांतर हे तात्पुरत्या कालावधीसाठी असेल तरच आम्ही सध्याच्या जागेवरून बाजुला होणार अशी भूमिका स्थानिकांनी मांडली आहे.

ब्रिज जीर्ण अवस्थेत असल्यानेच दुरूस्ती
लोअर परळचा ब्रिजचा उरलेला भाग तोडण्यात यावा अस पत्र रेल्वेकडून मुंबई महापालिकेकडे सातत्याने येत आहे. सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठीच हा संपूर्ण ब्रिज तोडून नव्याने बांधण्यात येणार आहे. सध्या या ब्रिज अतिशय जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळेच हा ब्रिज नव्याने बांधण्याची गरज असल्याचे मत बाजार विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगिता हनसाळे यांनी मांडले आहे. मंडईसाठी देण्यात आलेली पर्यायी जागेच स्ट्रक्चरल ऑडिट करूनच ही जागा मासळी विक्रेत्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -