यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

श्रीगणेश आगमन व विसर्जन याबाबतची पालिका व इतर प्राधिकरण यांच्या समन्वयाने योग्य नियोजन करण्यासाठी पालिका आयुक्त चहल यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात सर्वसंबंधीत प्राधिकरण, पालिका अधिकारी, गणेश मंडळे, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आदींची महत्वपूर्ण बैठक सोमवारी पार पडली.

मुंबई, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात श्रीगणेशोत्सव(mumbai ganeshotsav 2022) साजरा करण्यावर खूप कडक बंधने घालण्यात आल्याने गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले होते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गणेश भक्त जल्लोषात गणेशोत्सव साजरा करणार आहेत. राज्यातील नवीन शिंदे सरकारने तर गणेश मूर्तींवरील बंधने हटवली आहेत. मात्र मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, यंदाचा श्रीगणेशोत्सव हा कोरोना नियमांचे पालन करून पर्यावरणपूरक अशा पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन गणेश भक्तांना केले आहे. मुंबईत गणेशोत्सव काहीच दिवसांवर आल्याने या उत्सवाच्या निमित्ताने श्रीगणेश आगमन व विसर्जन याबाबतची पालिका व इतर प्राधिकरण यांच्या समन्वयाने योग्य नियोजन करण्यासाठी पालिका आयुक्त चहल यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात सर्वसंबंधीत प्राधिकरण, पालिका अधिकारी, गणेश मंडळे, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आदींची महत्वपूर्ण बैठक सोमवारी पार पडली.

हे ही वाचा – आदित्य ठाकरेंची तब्येत बिघडली, शिवसंवादच्या तिसऱ्या टप्प्यातील दौरा रद्द

या बैठकीला, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, आशीष शर्मा, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार , बेस्ट’चे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती तथा मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव विनोद घोसाळकर, सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त (परिमंडळ २) तथा श्री गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांच्यासह, विविध परिमंडळांचे व खात्यांचे उप आयुक्त, विभागांचे सहाय्यक आयुक्त, भारतीय नौदल, मुंबई पोलीस दलाचे संबंधित अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेश उत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, मूर्तीकार संघटनांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीच्या प्रारंभी, उप आयुक्त हर्षद काळे यांनी प्रास्ताविक केले. तसेच, महापालिकेद्वारे आतापर्यंत देण्यात आलेल्या मंडप परवानग्या, गणेशोत्सवासंबंधीच्या परवानग्या आदी माहिती बैठकीदरम्यान संगणकीय सादरीकरणाद्वारे देण्यात आली. तसेच, कृत्रिम तलावांची आकडेवारी, करण्यात येत असलेले नियोजन इत्यादीची माहिती देखील बैठकीदरम्यान देण्यात आली.

रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश

येत्या ३१ ऑगस्ट रोजी श्रीगणेशाचे आगमन होणार आहे. त्यानंतर दीड, पंकज, सात, दहा, अकरा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी श्रीगणेश विसर्जन मिरवणुकांचे मार्ग हे प्राधान्याने सन – २०१९ नुसार ठेवण्याचे यावेत. तसेच, पालिका प्रशासनाने आवश्यक तो जय्यत तयारी करून संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत.

आता सर्व २४ विभागांत गणेशोत्सवासाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमणार

मुंबईत(mumbai) सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महापालिका व बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती ( शहर व उपनगर) कार्यान्वित आहेत. त्यामुळे पालिकेला गणेश आगमन व विसर्जन निर्विघनपणे करणे सुलभ होते.आता मुंबई महापालिकेच्या २४ विभागांत गणेशोत्सवासाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमण्याचे आदेश पालिका आयुक्त चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत.

हे ही वाचा –  धनुष्यबाण नक्की कोणाचा? निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे दोघांचीही पाठ

गणेश आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्ड्यांचे विघ्न दूर करण्याचे आदेश

गणेशोत्सवात श्रीगणेशाचे आगमन व विसर्जन असताना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एखादी अप्रिय घटना घडून गणेशोत्सवाला गालबोट लागण्याची शक्यता असते. त्यामुळे गणेशोत्सव निर्विघनपणे पार पाडण्यासाठी रस्ते खात्याने काळजीपूर्वक पाहणी करावी व रस्त्यांवरील लहान – मोठे खड्डे बुजविण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी प्रशासनला यावेळी दिले.तसेच महत्त्वाच्या सर्व विसर्जन स्थळी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वैद्यकीय चाचणी व प्रथमोपचार कक्ष सुविधा उपलब्ध करण्यात यावी. मुंबईतील ज्या पुलांवरुन विसर्जन मिरवणुका जातात, त्या पुलांची पाहणी करण्याचे आदेश प्रमुख अभियंता (पूल) यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे,विसर्जन स्थळी असणा-या फिरत्या शौचालयांची स्वच्छता राखण्यासाठी आवश्यकतेनुसार स्वयंसेवी संस्थांकडून कामगार उपलब्ध करण्यात यावेत. रस्त्यांवर केबल लटकत असल्यास त्यामुळे श्रीगणेश विसर्जन मिरवणुकांना बाधा येऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन अनधिकृत केबल असल्यास त्या तातडीने हटविण्यात यावेत, असे आदेशही यावेळी देण्यात आले.पावसाळ्यात विशेषतः गणेशोत्सव काळात समुद्राला असलेल्या भरती – ओहोटीचे वेळापत्रक हे संबंधित विसर्जन स्थळी ठळकपणे लावण्याचे आदेशही देण्यात आले. त्याचप्रमाणे, श्रीगणेशमूर्ती विसर्जनानंतर विसर्जित मूर्तींची छायाचित्रे किंवा व्हिडिओचित्रण कोणीही करु नये, अशा सूचना प्रदर्शित करण्याची विनंती समन्वय समितीतर्फे करण्यात आली. त्यानुसार या प्रकारच्या सूचना प्रदर्शित करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले.

हे ही वाचा – राज्यात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता, कोकणासह मध्य महाराष्ट्रात अलर्ट जारी