घरताज्या घडामोडीमहापालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई शाळांची ऑनलाईन सोडत ३० एप्रिलला

महापालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई शाळांची ऑनलाईन सोडत ३० एप्रिलला

Subscribe

सोडतीसाठी दोन विद्यार्थी आणि पालकांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडतीच्या चिट्टी काढण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या सुरु केलेल्या शाळांची ऑनलाईन सोडत ३० एप्रिलला काढण्यात येणार आहे. या शाळांसाठी दोन हजार ४९७ अर्ज प्राप्त झाले आहेत. सोडतीसाठी दोन विद्यार्थी आणि पालकांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडतीच्या चिट्टी काढण्यात येणार आहे.

महापालिका हद्दीतील दुर्बल विद्यार्थ्यांना केंद्रीय बोर्डाच्या शाळांमध्ये शिक्षण मिळावे यासाठी मुंबई महापालिकेने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांसाठी सीबीएसई आणि आयसीएसई शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अंधेरी पूर्वेकडील पूनम नगर मनपा शाळेत सीबीएसई बोर्डाची शाळा तर माटुंगा पश्‍चिमेकडील वूलन मिल मनपा शाळेमध्ये आयसीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही बोर्डाच्या शाळा या सध्या प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येणार आहेत. त्यानुसार दोन्ही शाळांमध्ये ज्युनियर, सिनियर केजी पहिली ते सहावीचे वर्ग २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात येणार आहेत. या शाळांच्या प्रवेशाची प्रक्रिया २७ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. प्रवेशासाठी पालकांनी १२ मार्चपर्यंत अर्ज केले असून सीबीएसईच्या प्रवेशासाठी २ हजार १५४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. तसेच आयसीएसई शाळेसाठी ३४३ अर्ज आले आहेत.

- Advertisement -

चालू शैक्षणिक वर्षासाठी दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू केले जातील. तर इयत्ता तिसरी ते सहावीच्या वर्गात किमान १० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास तिसरी ते सहावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. ज्या इयत्तेत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची संख्या ३८ पेक्षा अधिक असेल त्याच वर्गाची सोडत काढण्यात येणार आहे. २७  एप्रिलला विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून १० मेपर्यंत गुगलमार्फत अर्ज भरून घेण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -