निवडणूक ड्युटीचा फटका पालिका कर्मचार्‍यांना; कापला एप्रिलचा पगार

BMC
मुंबई महानगर पालिका मुख्यालय

मुंबई महापालिकेच्या कर्मचार्‍यासाठी या एप्रिल महिन्यापासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याने या वाढीव पगाराच्या आनंदाऐवजी कापल्या गेलेल्या पगारांमुळेच कर्मचारी नाराज झालेले आहेत. महापालिकेच्या बहुतांशी कर्मचार्‍यांचा एप्रिल महिन्याचा पगार कापला गेला आहे. त्यामुळे बायोमेट्ीक हजेरीतील हा तांत्रिक दोष असल्याचा उुहापोह करत कामगार संघटनांनी या हजेरीच्या प्रणालीलाच स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु महापालिकेचे बहुतांशी कर्मचारी एप्रिल महिन्यात निवडणूक डयुटीवर गेले होते. परंतु कर्मचारी व अधिकार्‍यांच्या संबंधित विभागाने बायोमेट्ीक हजेरीच्या सॉफ्टवेअर प्रणालीत कर्मचार्‍यांच्या निवडणूक ड्युटीचा उल्लेखच न केल्यामुळे हजेरीअभावी अनेक कर्मचार्‍यांच्या पगाराला कात्री बसल्याची बाब समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीत महापालिकेच्या मुख्यालयांसह विविध प्रभागांमधील, खात्यांमधील बहुतांशी कामगार,कर्मचारी तसेच अधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक कामांसाठी हे कर्मचारी तैनात होते. परंतु निवडणूक कामांच्या दिवसांतच कर्मचार्‍यांची गैरहजेरी नोंदवली जावून त्यांचे पगार कापले गेल्याने कर्मचार्‍यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. महापालिकेत बायोमेट्ीक हजेरी ही पगाराला जोडण्यात आल्याने जेवढे दिवस सेवा बजावली, तेवढ्या दिवसांचा पगार गणला गेला आणि उर्वरीत दिवसांचा पगार कामगारांच्या खात्यात जमा झाला. त्यामुळे कामगार संघटनांच्या हाती आयतीच कोयती मिळाल्याने पुन्हा एकदा त्यांनी बायोमेट्ीक हजेरीविरोधात रान उठवण्यास सुरुवात केली.

मागील शनिवारी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे सरचिटणीस सत्यवान जावकर यांनी शिष्टमंडळासह उपायुक्त सुनील धामणे यांची भेट घेवून कर्मचार्‍यांच्या वेतनातून चुकीच्या पध्दतीने कापलेली रक्कम त्यांना परत करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणाची चौकशीची मागणी केली होती. तर सोमवारी दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी महापौर तसेच महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करत बायोमेट्ीक हजेरी व बेकायदेशीर कापण्यात येणार्‍या पगाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बायोमेट्ीक हजेरीबाबत मानव संसाधन विभागाने योग्य प्रकारे ही प्रणाली अद्ययावत करण्याबाबत कार्यवाही करावी. त्यामुळे ही प्रणाली जोवर अद्ययावत होत नाही,तोपर्यंत बायोमेट्ीक प्रणालीद्वारे हजेरी नोंदवण्यास व हजेरी वेतनास जोडण्याबाबत घेतलेल्या निर्णयास स्थगिती द्यावी अशी मागणी केली.

महापालिकेच्या अधिकार्‍यांनी मात्र, ज्या कर्मचार्‍यांचा पगाराची रक्कम कापली आहे, ती घटना खात्याच्या चुकीमुळे घडली असल्याचे सांगितले. प्रत्येक कर्मचार्‍यांची हजेरीचे तास व सेवा कालावधी हा निश्चित असून त्याप्रमाणे प्रत्येक खात्याच्या तसेच विभागाच्या अधिकार्‍याने या प्रणालीत तशी नोंद करायला हवी. महापालिकेच्या कर्मचार्‍यांची लोकसभा निवडणूक कामांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे जे कर्मचारी निवडणूक कामांसाठी गेले आहेत, त्यांची नोंद संबंधित विभागाने तथा खात्याने कर्मचार्‍यांच्या नावापुढे करणे अपेक्षित होते. काही विभागाने तशी नोंद केली होती. पण काहींनी केलेली नव्हती. त्यामुळे ज्या विभागाने कर्मचार्‍यांच्या नावापुढे निवडणूक ड्युटीचा उल्लेख केला नाही, त्या कर्मचार्‍याची गैरहजेरी गृहीत धरून त्याचा पगार कापण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, जे कर्मचारी खरोखरच निवडणूक कामांसाठी होते आणि त्यांचा पगार जर कापला गेला असेल, तर अशा कर्मचार्‍यांच्या कापलेल्या पगाराची रक्कम त्यांना पुढील पगारातून दिली जाईल,असेही महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.