पालिका रुग्णालयाचे कर्मचारी किराणा कुपन्सपासून वंचित

एका खासगी कंपनीकडून प्रत्येक कर्मचाऱ्याला १५०० रुपयांचे कुपन्स दिले होते.

कोरोनाचा सामना करणाऱ्या पालिकेमधील परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, कंत्राटी कामगार, खाडाबदली कामगार, आरोग्य सेविका यांच्या घरामध्ये लॉकडाऊनच्या काळात किराणा मालाची कमतरता जाणवू नये, यासाठी एका खासगी कंपनीकडून प्रत्येक कर्मचाऱ्याला १५०० रुपयांचे कुपन्स दिले होते. मात्र, पालिका रुग्णालयामधील वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर या गलेलठ्ठ वेतन घेणाऱ्यांनी हे कुपन्स लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

कोरोनाविरोधात लढा देत असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वेतन कमी असतानाही ते दिवसरात्र कोरोनाच्या रुग्णांची सेवा करत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत एका खासगी कंपनीने परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, स्वच्छता कंत्राटी कामगार, हाऊस किपिंगचे कंत्राटी कामगार, खाडाबदली कामगार, आरोग्य सेविका, रुग्णवाहिनी आणि शववाहिनी यांचे कामगार यांना प्रत्येकी १५०० रुपयांचे किराणा मालाचे कुपन्स देण्यात आले होते. हे कुपन्स पालिकेच्या प्रमुख कर्मचारी अधिकाऱ्यांमार्फत पालिकेची मुख्य हॉस्पिटल, १६ उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृह यांच्या प्रमुखांकडे पाठवण्यात आली. मात्र, ज्यांच्यासाठी ही कुपन्स पाठवण्यात आली होती.

त्या सर्वांपर्यंत ही कुपन्स पोहोचण्याऐवजी काही कर्मचाऱ्यांना देत वरिष्ठ अधिकारी, अधीक्षक व डॉक्टर यांनी वाटून घेतल्याचा प्रकार पालिकेच्या ऍक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालयासह  अनेक रुग्णालयामध्ये घडला आहे. ऍक्वर्थ कुष्ठरोग हॉस्पिटलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अन्य डॉक्टरांनी प्रथम कुपन्स घेतले तर चतुर्थश्रेणी व अन्य कंत्राटी कामगारांना कुपन्सच दिले नाहीत. त्यामुळे किरकोळ वेतन असलेल्या कंत्राटी व चतुर्थ श्रेणी कामगारांऐवजी लाखो रुपयांचे वेतन घेणाऱ्या डॉक्टरांनी याचा फायदा घेतल्या प्रकरणी कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राजवाडी हॉस्पिटलमध्ये कुपन्स मागण्यांसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

खासगी कंपनीकडून कोरोनाच्या लढ्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या पाणी पुरवठा विभाग, सफाई विभागातील कर्मचाऱ्यांना कूपन्सचे सुरळीत वाटप होत असताना रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांना अशी दुय्यम वागणूक देण्यात येत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जर सर्व कर्मचाऱ्यांना कुपन्स मिळणार नसतील तर आम्ही आमचे कुपन्स परत देऊ अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. तसेच चतुर्थश्रेणी कामगार आणि अन्य कर्मचारी यांना कूपन्स देण्यासाठी परिपत्रकाची अडचण निर्माण झाली, ती अडचण आपण दूर करून रुग्णालयामधील सफाई कामगारांसहित अन्य कर्मचाऱ्यांना कूपन्स देऊन त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा, यासाठी म्युनिसिपल मजदुर युनियनने पुढाकार घेत पालिकेच्या लेखा विभाग प्रशासकीय अधिकारी आणि मुख्य लिपिक यांच्याकडे तक्रार केली आहे.

यासंदर्भात पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या मीटिंगमध्ये असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

चतुर्थश्रेणी कामगारांसहित अन्य कर्मचाऱ्यांना कूपन्स न मिळाल्याबद्दल पालिकेच्या लेखा विभाग प्रशासकीय अधिकारी आणि मुख्य लिपिक यांच्याकडे तक्रार केली आहे.  ज्या नियमाखाली व परिपत्रकाप्रमाणे उपवैद्यकीय अधीक्षकांनी स्वतः सह अन्य डॉक्टर्स यांना कूपन्स घेतल्या त्याची सखोल चौकशी करावी. – प्रदीप नारकर, चिटणीस, म्युनिसिपल मजदुर युनियन, मुंबई