घरमुंबईमुंबई महापालिका पुन्हा मांडणार फुगीर अर्थसंकल्प

मुंबई महापालिका पुन्हा मांडणार फुगीर अर्थसंकल्प

Subscribe

राखीव निधीतून ३ हजार कोटी काढणार , नवे प्रकल्प आणि योजनांचा अभाव

वास्तवदर्शी व पारदर्शी अर्थसंकल्प बनवून फुगीर अर्थसंकल्प बनवणार्‍या मुंबई महापालिकेकडून पुन्हा एकदा फुगीर अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. आगामी अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या प्रकल्पांची तसेच योजनांचा अंतर्भाव नाही, उलट सुरु असलेल्या प्रकल्पांनाच गती देण्यासाठी भरीव तरतूद केली जाणार आहे.

आगामी अर्थसंकल्प सुमारे साडेचार ते पाच हजार कोटींनी वाढला जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पाचा हा फुगा फुगवताना मुंबई सागरी किनारा प्रकल्पांसह (कोस्टल रोड)इतर प्रकल्पांसाठी राखीव निधीतून सुमारे ३ हजार कोटी रुपये काढले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महापालिकेच सन २०१८-19चा २७ हजार २५८ कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांनी मांडला होता. याला स्थायी समिती व महापालिकेनेही मंजुरी दिली. परंतु हा संपूर्ण अर्थसंकल्प वास्तवदर्शी व पारदर्शी मांडताना, आयुक्तांनी अर्थसंकल्पाचा आकार कमी केला होता. चालू अर्थसंकल्प मांडताना आयुक्तांनी, मुंबई सागरी किनारा प्रकल्पांसह मोठ्या प्रकारच्या १६ प्रकल्पांची कामे निश्चित करून त्यासाठी ५८,८६४ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले होते. त्यामुळे उपलब्ध असलेल्या राखीव निधीतून या प्रकल्पाचा खर्च भागवण्यासाठी ४२,७५७ कोटींचा निधी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. महापालिकेच्या या मेगा प्रकल्पांसाठी होणारा खर्च आणि उपलब्ध राखीव निधी यामध्ये १६ हजार कोटी रुपयांचा निधी कमी असल्याचा दावाही आयुक्तांनी त्यावेळी केला होता.

- Advertisement -

मात्र, २०१९-20च्या अर्थसंकल्पात कोस्टल रोडसह इतर प्रकल्पांच्या कामांसाठी सुमारे ३ हजार कोटी रुपये उपलब्ध राखीव निधीतून काढले जाणार आहेत. अर्थसंकल्प बनवताना राखीव निधीतील ३ हजार कोटींचा समावेश करून अर्थसंकल्पाचा डोलारा वाढवला जाणार आहे. चालू अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी १५०० कोटी रुपायांची तरतूद केली होती. परंतु आता हा प्रकल्प खर्‍या अर्थाने मार्गी लागला आहे.

यासाठी पुढील अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी अधिक निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी अधिक रकमेच्या निधीची तरतूद करावी लागणार असल्याने राखीव निधीतील रकमेचा वापर केला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याकडून समजते.

- Advertisement -

सायकल ट्ॅक, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, मुंबई मलनि:सारण प्रकल्प, मोठ्या जलवाहिन्यांची कामे, चरविरहित व खुल्या चर पध्दतीने मलनि:सारण वाहिनी टाकणे, मिठी नदी प्रकल्पाची कामे- मलनि:सारण प्रकल्प, एम.टी.अगरवाल रुग्णालय, टाटा कंपाऊंड होस्टेल इमारत, वांद्रे, भाभा रुग्णालये, टोपीवाला मंडई, नायर रुग्णालय दंत महाविद्यालय विस्तारीत इमारतींकरता, चेंबूर ते ट्रॉम्बे आणि वडाळा प्रकल्प एक व दोन अशा प्रकल्पांच्या कामांना मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात या मोठ्याप्रकल्पांसाठी भरीव निधीची तरतूद करावी लागणार आहे. या वर्षात अनेक प्रकल्प सुरू होत असल्याने राखीव निधीतून रक्कम काढली जाईल आणि राखीव निधी कमी होईल अशी भीती मागील अर्थसंकल्पात अजोय मेहता यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली होती.

त्यानुसारच आगामी अर्थसंकल्पात कोस्टल रोडसह इतर प्रकल्पांसाठी ३ हजार कोटी रुपये राखीव निधीतून काढले जाणार असून त्यामुळे राखीव निधीच्या आधारे अर्थसंकल्प ३३ हजार कोटी रुपयांच्या आसपास पोहोचेल, अशी माहिती मिळत आहे. यापूर्वी आर्थिक मंदीच्या काळात राखीव निधीतून २५०० कोटी रुपये काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता, त्यानंतर आता पुन्हा राखीव निधीला हात लावला जात आहे. विशेष म्हणजे जकातीला पर्याय म्हणून जीएसटीसह मालमत्ता कर व इतर शुल्क आणि कराच्या माध्यमातून महसूल गोळा केला जात असला तरी यंदा या महसूली उत्पन्नाचे प्रमाण आवश्यक तेवढे नाही तसेच कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येत असल्याने त्यांचाही भार पडणार आहे. त्यामुळेच राखीव निधीतून ३ हजार कोटींची रक्कम काढावी लागत आहे,असेही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या ४ फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पावर महापालिका आयुक्त अजोय मेहता हे शेवटचा हात फिरवत आहेत. देशातील सर्वात मोठी असलेल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पावर मुंबईकरांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात काय काय असेल याचा वेध घेणारी ही मालिका…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -