घरताज्या घडामोडीभिवंडीत उसनवारीच्या पैशांवरून हत्या!

भिवंडीत उसनवारीच्या पैशांवरून हत्या!

Subscribe

१ एप्रिल रोजी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पोगाव पाईपलाईन शेजारी एका तरुणाची हत्या झाली होती.

एकिकडे कोरोनाने थैमान घातले असले तरी देखील भिवंडीतील गुन्हेगारीच्या घटना सुरूच असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. १ एप्रिल रोजी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पोगाव पाईपलाईन शेजारी एका तरुणाची हत्या झाली होती. रक्ताच्या थारोळ्यात या तरुणाचे प्रेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान संचारबंदीच्या काळात घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हत्येच्या आरोपींचा शोध घेण्याची निर्देश गुन्हे शाखेसह तालुका पोलिस ठाण्याचे प्र. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांना दिले होते.
या हत्येप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी इसमांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हत्या झालेल्या तरुणाची ओळख पटली नसल्याने मयताच्या ओळखी बरोबरच अज्ञात आरोपींच्या मुसक्या अवळण्याचे दुहेरी संकट तालुका पोलिसांसह गुन्हे विभागासमोर होते. तालुका पोलीसांसह मुरबाड व शहापूर गुन्हे शाखा पोलिसांची तीन पथके आरोपीच्या शोधासाठी तयार करण्यात आली होती. मात्र पोलीसांनी मोठ्या शिताफीने मयताची ओळख पटवून या हत्येच्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.
सोहेल लालाखान पठाण ( वय १८ वर्ष , रा. रहमतपुरा शांतीनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्यास नशा करण्याची सवय असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सोहेल याने त्याचा मित्र शाहबाज मोहमद शाकीर अंसारी (रा. शांतीनगर, आझादनगर) याच्याकडून दिड महिन्यांपूर्वी २० हजार रुपये उसने घेतले होते. या पैशांवरून त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळताच पोलोसांनी शाहबाज अंसारी यास त्याब्यात घेऊन त्याच्याकडून कसून चौकशी केली असता मयत सोहेल याने उसने घेतलेले पैसे देण्यास नकार देऊन शाहबाज यास शिवीगाळ केली होती. या गोष्टीचा राग धरून शाहबाज याने सोहेल यास भेटायला बोलावून रस्त्याने पायी पोगाव येथील पाईपलाईन जवळ घेऊन जाऊन सोहेल याच्या पोटावर, डोक्यावर व गळ्यावर धारदार सूऱ्याने वार करून त्याच्या डोक्यात दगड घालून त्यास ठार मारल्याची शाहबाज याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यास रविवारी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती तपास अधिकारी तथा तालुका पोलीस ठाण्याचे प्र. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ शिवाजी राठोड , अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार राठोड, उपविभागीय पोलोस अधीक्षक दिलीप गोडबोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -