Eco friendly bappa Competition
घर मुंबई महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचा निधीसाठी आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल

महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचा निधीसाठी आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल

Subscribe

यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना) गटाचे आमदार दिलीप लांडे हे आयुक्त कार्यलयाच्या येथून जात असल्याचे निदर्शनास येताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी "५० खोके एकदम ओके", "५० खोके माजलेत बोके", अशा या घोषणा दिल्या.

 

मुंबईः भाजपच्या माजी नगरसेवकांप्रमाणेच इतर नगरसेवकांनाही प्रत्येकी तीन कोटींचा निधी देण्याची मागणी करीत महाविकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी सोमवारी पालिका मुख्यालयातील आयुक्त इकबाल चहल यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी हल्लाबोल केला.

- Advertisement -

यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना) गटाचे आमदार दिलीप लांडे हे आयुक्त कार्यलयाच्या येथून जात असल्याचे निदर्शनास येताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी “५० खोके एकदम ओके”, “५० खोके माजलेत बोके”, अशा या घोषणा दिल्या.

यावेळी, पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची बाजू थोडक्यात ऐकून घेतली. तसेच, ‘बघतो’. मात्र मला शासन आदेशाप्रमाणेच काम करावे लागेल. त्यामुळे ‘तुम्ही हवे तर न्यायालयात जा व तिकडे दाद मागा’, असा उपरोधिक सल्ला दिल्याने महाविकास आघाडीच्या विशेषतः उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांतर्फे माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी व माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

- Advertisement -

यावेळी, उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्त कार्यालयात बसून काही वेळ ठिय्या आंदोलन केले. तोपर्यंत आयुक्त चहल यांनी, भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी चर्चा करण्याचा बहाणा करीत तेथून काढता पाय घेतला. मात्र ही बाब समजताच माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी, आयुक्त यांनी आमचा संताप बघून ‘पळ काढला’ अशी टीका केली.

यावेळी, उद्धव ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक व माजी महापौर श्रद्धा जाधव, स्नेहल आंबेकर, माजी उप महापौर हेमांगी वरळीकर, माजी सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, अनंत नर, राजू पेडणेकर, अरुंधती दुधवडकर, सुजाता पाटेकर, माजी बाजार व उद्यान समिती उपाध्यक्ष तुकाराम पाटील, शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा संध्या दोशी, सचिन पडवळ, स्नेहल मोरे, सुजाता सानप, दत्ता पोंगडे आदी नगरसेवकांनी उत्स्फूर्तपणे घोषणाबाजी केली.
यावेळी, काँग्रेसकडून माजी नगरसेवक सुफियान वणू व राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी गटनेत्या राखी जाधव या उपस्थित होत्या.

…तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार : विश्वनाथ महाडेश्वर

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल हे निधी वाटपात भेदभाव करीत आहेत. तसेच, पालक मंत्र्यांच्या सल्ल्याने निधीचे वाटप करणार आहेत. हे भारतीय संविधानाला धरून नाही. सर्व प्रभागात विकास कामासाठी समान निधी मिळायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. जर पालकमंत्र्यांनी नियमांचे उल्लंघन केले तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे.

आयुक्तांकडून निधी वाटपात भेदभाव : विशाखा राऊत

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल हे भाजपच्या माजी नगरसेवकांना प्रत्येकी ३ कोटी रुपयांचा निधी देतात. तर इतर पक्षांच्या माजी नगरसेवकांना फक्त १ कोटींचा निधी देऊन निधी वाटपात भेदभाव करीत आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य शासन यांच्या दबावाखाली निर्णय घेत आहेत, असा आरोप करीत माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी यावेळी आयुक्त चहल यांच्यावर तोफ डागली.

- Advertisment -