घरमुंबईमविआने प्रागतिक पक्षांना विश्वासात घ्यावे, शेकाप नेते जयंत पाटलांचे आवाहन

मविआने प्रागतिक पक्षांना विश्वासात घ्यावे, शेकाप नेते जयंत पाटलांचे आवाहन

Subscribe

राज्यातील प्रागतिक पक्ष कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी भाजपसोबत जाणार नाहीत, मात्र महाविकास आघाडीने गृहीत न धरता या सर्व पक्षांना विश्वासात घ्यावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी केले आहे.

मुंबई : राज्यातील प्रागतिक पक्षांच्या आघाडीतर्फे राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची संवाद सभा काल चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबरच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. डॉ. अशोक ढवळे, कॉ. उदय नारकर, जनवादी महिला सभेच्या कॉ. मरियम ढवळे, समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, जनता दलाचे प्रभारी अध्यक्ष नाथा शेवाळे, महासचिव प्रताप होगाडे, शेकापचे भाई प्रा. एस. व्ही. जाधव, भारतीय रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अॅड (डॉ). सुरेश माने, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. किशोर ढमाले, आरपीआय सेक्युलरचे पँथर श्याम गायकवाड, सीपीआय एमएल लिबरेशनचे कॉ. अजित पाटील, लाल निशाण पक्षाचे कॉ. विजय कुलकर्णी आदी नेते उपस्थित होते.

हेही वाचा – “उद्धव ठाकरे विकासाच्या विरोधात…”, देवेंद्र फडणवीसांची टीका

- Advertisement -

आताच्या भाजपपेक्षा अधिक मोठे यश १९७१ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी मिळवले होते. परंतु पाच वर्षात देशात सत्ता परिवर्तन झाले होते; याची आठवण करून देत, दिवा मोठा होतो तेव्हा तो मालवायला आलेला असतो, याचे भान भाजपने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवावे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच, प्रागतिक पक्षांचा मुख्य शत्रू वा विरोधक भाजपच आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी, ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी, शेतीला उद्योग म्हणून दर्जा मिळावा, शेतीच्या विम्याचा काळाबाजार आधी प्रश्नांवर पुढील काळात आंदोलनाचे मोहोळ राज्यभरात उठविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. येत्या काळात राज्यात विभागवार नेत्यांच्या बैठका व कार्यकर्त्यांचे मेळावे व शेवटी मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येईल, असा कार्यक्रमही त्यांनी जाहीर केला आहे.

समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा आणि एकटे पाडण्याचा प्रयत्न संघ परिवाराकडून होत आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तर भाजपची उलटी गिनती सुरू झाली असून 2024 मध्ये देशात परिवर्तन अटळ आहे, त्यासाठी राज्यातील प्रागतिक पक्षांनी संघटित राहून आपली ताकद वाढविली पाहिजे, असे प्रतिपादन माकपचे नेते डॉ. अशोक ढवळे यांनी केले.

- Advertisement -

विजेच्या प्रश्नावर बोलताना जनता दलाचे प्रताप होगाडे यांनी सरकार आणि व्यवस्थापनातील भ्रष्टाचारामुळे राज्यातील जनतेला देशातील सर्वात महागडी वीज खरेदी करावी लागत असल्याचा आरोप केला. सरकारने ठरवले तर शेतकऱ्यांना मोफत वीज देणे शक्य आहे, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. तर संघ परिवाराने निर्माण केलेल्या धार्मिक उन्मादाला तोंड देण्यासाठी धर्म प्रबोधनाची चळवळ सुरू करण्याची आवश्यकता किशोर ढमाले यांनी व्यक्त केली.

कोकणच्या विकासासाठी आणि रोजगारासाठी रिफायनरीची गरज असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र प्रगत तंत्रज्ञानामुळे कमाल 950 उच्च शिक्षितांनाच येथे नोकऱ्या मिळतील, ज्यात स्थानिक कुणीच नसतील! प्रदुषणाला मात्र कायमचे तोंड द्यावे लागेल, असे सीपीआयएमएल (लिबरेशन)चे कॉ. अजित पाटील म्हणाले. यावेळी बारसू परिसरात सुरू असलेल्या रिफायनरी विरोधी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. शेकापचे राजेंद्र कोरडे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -